

पुणे : पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. या निर्णयामुळे महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपमधील अनेक दिग्गज पुरुष नेत्यांचे महापौर होण्याचे स्वप्न तात्पुरते भंगले असून, पालिकेत आता खऱ्या अर्थाने ‘महिला राज’ येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १६५ पैकी ११९ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. आता सर्वांचे लक्ष महापौरपदाकडे लागले आहे. यंदा भाजपने ९२ महिलांना उमेदवारी दिली होती, त्यापैकी ६७ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. या महिला नगरसेविकांपैकी कोणाची गळ्यात महापौरपदाची माळ पडेल, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
अनेक दिग्गज महिलांची नावे चर्चेत
सध्या महापौरपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गज महिलांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये पाच वेळा निवडून आलेल्या आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहे. त्यांच्यासोबत वर्षा तापकीर (चौथ्यांदा विजय), राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भगिनी मानसी देशपांडे, तसेच बिनविरोध निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे यांचीही चर्चा जोरदार आहे. याव्यतिरिक्त दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट आणि निवेदिता एकबोटे यांचाही विचार पक्षश्रेष्ठींकडून होऊ शकतो. भाजप नेहमीच ‘धक्कातंत्राचा’ अवलंब करत असल्यामुळे ऐनवेळी एखादा नवा चेहरा समोर येऊन सर्वांना चकित करण्याची शक्यता आहे.
सव्वा-सव्वा वर्षांचा महापौरपदाचा कार्यकाळ?
दरम्यान, पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना संधी देण्यासाठी भाजप सव्वा-सव्वा वर्षांचा महापौरपदाचा कार्यकाळ ठरवू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुरुष नेत्यांचा हिरमोड; इतर पदांकडे लक्ष
महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने भाजपमधील ज्येष्ठ पुरुष नेत्यांचा काहीसा हिरमोड झाल्याचे जाणवते. माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष धीरज घाटे आणि गणेश बिडकर यांच्यांनी महापौरपदासाठी तयारी केली होती. मात्र आता या नेत्यांना सभागृह नेतेपद किंवा स्थायी समिती अध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या पदांवर संधी मिळू शकते. विशेषतः सभागृह चालवण्यासाठी अनुभवी नगरसेवकाची गरज असल्यामुळे गणेश बिडकर यांचे नाव सभागृह नेतेपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जाते.
आगामी महापौरांसमोर आव्हाने
पुण्याच्या आगामी महापौरांसमोर आव्हानांचा मोठा डोंगर उभा आहे. गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत शहरातील नागरी सुविधांचे झालेले नुकसान भरून काढणे, शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास करणे आणि जायका, नदी सुधार, मेट्रो यांसारख्या १५,००० कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन करणे ही प्रमुख आव्हाने असतील. तसेच, महापालिकेच्या तिजोरीतील मर्यादित निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार आणि विकासकामे यांचा समतोल राखणे ही नवीन महापौरांसाठी कसोटी ठरेल.
भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. पक्षाचे नेतृत्व सर्वांशी चर्चा करून निर्णय घेईल. गटनेता अद्याप निवडला नाही. लवकरच निवडला जाईल.
शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप