

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, यंदा प्रथमच हे पद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयावर ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आनंद व्यक्त केला असून, समाजातील वंचित व सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत महापौर शिवसेनेचाच होणार असल्यावर त्यांनी भर दिले.
या संदर्भात मीनाक्षी शिंदे सांगितले की, गेली १९ वर्षे महापालिकेत कार्यरत आहे. या प्रदीर्घ कालावधीत पहिल्यांदाच ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाला आरक्षण मिळाले आहे. या निर्णयामुळे समाजातील एका विशिष्ट वर्गाला नेतृत्वाची संधी मिळणार असून, हा खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी नमूद केले.
भाजपकडूनही या पदासाठी दोन नावांची चर्चा असल्याबाबत विचारले असता, मीनाक्षी शिंदे यांनी ठामपणे सांगितले की, महापौर तर शिवसेनेचाच होणार आहे. महापालिकेत शिवसेनेचे भक्कम संख्याबळ (७५ नगरसेवक) असल्याने आगामी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ठाणे महापालिकेवर भगवाच फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"निर्णय वरिष्ठ (साहेब) घेतील"
महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर आता या पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेकडे या पदासाठी सुमारे सात इच्छुकांची नावे असल्याची चर्चा असली तरी, यावर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय वरिष्ठ (साहेब) घेतील. उमेदवाराची ज्येष्ठता (सिनिअरिटी) आणि पक्षाचे इतर निकष लक्षात घेऊनच योग्य निर्णय घेतला जाईल.