

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा भलामोठा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला दोन दिवस (४८ तास) उलटून गेले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अद्यापही युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असले, तरी दुर्दैवाने त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ढिगाऱ्याखाली अद्यापही ८ कर्मचारी अडकले असून, त्यांच्या सुरक्षेसाठी बाहेर थांबलेल्या कुटुंबीयांनी टाहो फोडला आहे.
अत्याधुनिक यंत्रसामग्री, श्वानपथकाद्वारे शोधकार्य
कचऱ्याचा ढिगारा प्रचंड मोठा आणि खोल असल्याने बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय सेना, पिंपरी-चिंचवड मनपा अग्निशमन विभाग, ‘पीएमआरडीए’, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाचे जवान अहोरात्र काम करत आहेत.
इमारतीचा समोरील प्रवेश मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने आता जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या साहाय्याने मागील बाजूचा मलबा हटवून मार्ग तयार केला जात आहे. अस्थिर भाग सुरक्षित करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि श्वानपथकाची मदत घेतली जात आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील पहिला व्हिडीओ समोर आला असून, त्यात दबलेले ऑफिसचे टेबल आणि विजेची उपकरणे दिसत आहेत.