Pune : कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक

पुण्यात कौटुंबिक वादातून ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्ही क्विक टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Pune : कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक
Pune : कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पुणे : घरातील वादाचा राग चिमुकल्यावर काढल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. घरगुती भांडणातून एका महिलेने अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्ही क्विक टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत बाळाच्या तोंडाला गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

याप्रकरणी अल्ताप नबी शेख (३९) यांनी लोहगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सानिया शेख, रियाज इमाम हाल्याळ आणि हाजी मलंग शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा धक्कादायक प्रकार ३१ जुलै रोजी पहाटे सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास लोहगावमधील कलवड वस्ती येथील त्यांच्या राहत्या घरी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताप शेख आणि त्यांचा भाऊ एकत्र राहत असून, काही दिवसांपासून त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होता. या जुन्या भांडणाच्या रागातून सानिया शेख हिने अल्ताप शेख यांच्या नऊ महिन्यांच्या मुलाच्या तोंडात फेव्ही क्विक टाकल्याचा आरोप आहे.

आईच्या लक्षात आला प्रकार

घटनेनंतर बाळाला उलटी होऊ लागली. त्यानंतर त्याची आई जैनाब शेख यांनी बाळाच्या तोंडाकडे पाहिले असता त्याचे ओठ चिकटल्यासारखे झाल्याचे दिसले. संशय आल्याने त्यांनी तातडीने पतीला फोन करून माहिती दिली. यानंतर बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाच्या तोंडाला जखमा झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या बाळाची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी दिली.

तक्रार केल्यास धमकी दिल्याचा आरोप

फिर्यादीनुसार, जैनाब शेख यांनी सानिया शेख यांना याबाबत विचारणा केली असता, "ही गोष्ट कोणाला सांगितली तर सोडणार नाही," अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच, आरोपी महिलेचे नातेवाईक रियाज हाल्याळ आणि हाजी मलंग शेख हे रुग्णालयात आले. त्यांनीही "बाळ व्यवस्थित आहे. आता तक्रार केली तर परिणाम भोगावे लागतील," अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

Pune : कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक
नागपुरात मैत्रीला काळीमा! ३ हजारांच्या उधारीपायी मित्रालाच संपवलं, दोघे अटकेत

फेव्ही क्विक तोंडात गेल्यास काय होऊ शकते?

फेव्ही क्विकमध्ये सायनोॲक्रिलेट (Cyanoacrylate) हे रसायन असते. हवेशी संपर्क होताच ते काही क्षणांत घट्ट चिकटते. हे रसायन तोंडात गेल्यास ओठ आणि तोंडातील भाग एकमेकांना चिकटू शकतात. तसेच तोंडाच्या आतील त्वचेवर जखमा होण्याची शक्यता असते. मोठ्या प्रमाणात गिळल्यास अन्ननलिका किंवा इतर अंतर्गत अवयवांनाही इजा होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडल्यास कोणताही घरगुती उपाय न करता तातडीने रुग्णालयात उपचार घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.

पोलिस तपास सुरू

या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले पुढील तपास करत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in