

मंगळवारी (दि.३) सायंकाळी सुमारे ५ वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रसायनयुक्त गॅसने भरलेला टँकर उलटला आणि त्यातून वायू गळती सुरू झाली. या घटनेनंतर एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांसाठी अडचणींचा सामना करावा लागला.
या परिस्थितीची दखल घेत गेल्या १८ तासांपासून एक्सप्रेसवेवर अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी मदतीची मोहीम सुरू केली आहे. सध्या पोलिसांकडून मदत केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांची मदत
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिस एक्सप्रेसवेवर अडकलेल्या प्रवाशांना पाणी व अन्नाचे वाटप करत आहेत. व्हिडीओंमध्ये पोलिस कर्मचारी दुचाकींवरून वाहनांच्या रांगेत फिरत पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांचे पाकीट देताना दिसत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना प्राधान्य देऊन मदत केली जात आहे.
एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, "परिस्थिती पूर्णपणे सुधारत नाही तोपर्यंत पोलिसांची मदत सुरूच राहील."
माहितीनुसार, अपघातानंतर सुरक्षेच्या कारणामुळे संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली होती. रात्रभर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथकाने गळती थांबवण्याचे आणि टँकर हटवण्याचे काम केले. मात्र, वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेली नाही.
पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची समस्या
माहितीनुसार, बुधवारी अनेक प्रवाशांनी "२४ तासांपासून एकाच ठिकाणी अडकलो आहोत" अशी तक्रार केली. वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची समस्या निर्माण झाली आहे. मुंबईतील रुग्णालयांकडे जाणारे रुग्ण, कॅन्सर रुग्ण तसेच दूरवरून आलेल्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
एकेरी वाहतूक सुरू
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना एक्सप्रेसवे टाळून ताम्हिणी घाट किंवा माळशेज घाट मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. काही काळासाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असली, तरी वाहनांची संख्या जास्त असल्याने संपूर्ण मार्ग सुरळीत होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.