

पुणे : मद्यधुंद अवस्थेत तेही उलट्या दिशेने कार चालवणाऱ्या महिला पोलिस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अश्विनी फुलचंद केकाण असे महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, पुण्यातील मांजरी परिसरात घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. ३९ वर्षीय केकाण या मद्यधुंद अवस्थेत वाहतुकीच्या उलट्या दिशेने कार चालवत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला.
कार थेट फुटपाथवर
संबंधित महिला पोलिस कर्मचारी काळेपडळ पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. शेवाळवाडी येथील रामानंद हॉटेलसमोरील रस्त्यावर ही घटना घडली. केकाण या गणवेशात असताना राखाडी रंगाची मारुती सुझुकी बलेनो कार चालवत होत्या. त्यात त्यांच्या कारला नंबर प्लेटही नव्हती. त्यांनी वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने कार चालवत समोरून येणाऱ्या वाहनांना कट मारला. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट फुटपाथवर चढली. त्यानंतर त्यांनी अन्य वाहनचालक आणि उपस्थित नागरिकांना शिवीगाळ केल्याचेही सांगितले जात आहे.
VIDEO मध्ये मद्यपान केल्याची कबुली
व्हिडीओमध्ये केकाण या पोलिस गणवेशात चालकाच्या आसनावर बसलेल्या दिसतात. स्थानिक नागरिकांनी त्यांना मद्यपान केले आहे का, अशी विचारणा केली असता, त्या मद्यपान केल्याचे मान्य करताना दिसतात. "मॅडम, तुम्ही ड्रिंक केलीये का?" असा प्रश्न विचारल्यानंतर, "नाही... मी दारू पिलीये," असे उत्तर त्या देताना ऐकू येत आहे.
वैद्यकीय तपासणीत मद्यपान केल्याचे स्पष्ट
या घटनेनंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत केकाण यांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस दलाची प्रतिमा मलिन होईल असे वर्तन केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलिस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.
निलंबनाच्या काळातही निर्बंध
निलंबनाच्या आदेशानुसार, या कालावधीत केकाण यांना कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच पूर्वपरवानगीशिवाय त्यांना पोलिस मुख्यालय सोडण्यासही मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत संबंधित महिला पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनेच्या दिवशी केकाण या कर्तव्यावर नव्हत्या. त्यापूर्वी त्या पुण्यातील बंड गार्डन परिसरात मित्रमैत्रिणींसोबत पार्टीसाठी गेल्या होत्या का, याचीही तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. त्यांनी नेमके कोणत्या वेळी आणि कुठे मद्यपान केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.