

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि.२४) संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी शपथ घेत सूचक इशारा दिला.
आज दोघं इथे बसलेलो आहोत...ठाकरे बंधू!
उद्धव ठाकरे म्हणाले, "संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. तो जो मंगलकलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला नाही. त्याच्यामागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. १०५, १०७ किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला निवडून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे. कारण; आम्ही आज दोघं इथे बसलेलो आहोत...ठाकरे बंधू!
मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले आणि...
पुढे ते म्हणाले, "आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या ५ सेनापतींपैकी एक सेनापती...त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजेच शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होतं. त्याच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही. पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कांसाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. पुढच्या वर्षी शिवसेनेला ६० वर्षे होतील."
मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे त्यांचे मनसुबे
"इतकी वर्षे व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहत आहोत की, मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती, त्यांचेच दोन प्रतिनिधी वरती म्हणजे दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे मनसुबे आहेत. आणि आता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काही संघर्ष, ते जे काही हुतात्मा स्मारक आहे, त्याचा मोठा अपमान होईल. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि मी मागेच म्हटलं, एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी." असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच युतीबाबत स्पष्ट मत मांडले.
तुटू नका, फुटू नका आणि...
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, "उत्साह अमाप आहे. मला कल्पना आहे की, आज केवळ महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश बघतोय. मी सर्वांना विनंती करतोय, आवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय, कारण मागे विधानसभेच्या वेळेला भाजपने जो अपप्रचार केला होता 'बटेंगे तो कटेंगे'...तसंच मी मराठी माणसांना सांगतोय, आता जर का 'चुकाल तर संपाल', आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका. हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो.
तर त्याचा राजकारणात खात्मा...
"यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावर कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने मुंबईला महाराष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत." असा सूचक इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला.
भाजपला काय हवं ते...
पुढे ते म्हणाले, "मला खात्री आहे की, मराठी माणूस सहसा कुणाच्या वाटेला जात नाही. पण त्याच्या वाटेला जर कुणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही. भाजपला काय हवं ते भाजपने पाहावं, महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय हवं ते आम्ही पाहतो." असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन
पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथील दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, शिवसेना आणि मनसेचे नेते, उपनेते, सचिव, खासदार, आमदार तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक-मनसैनिक यांची उपस्थिती होती.
मराठीसाठी, मराठी माणसांसाठी एकत्र
काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांचा एक पॉडकास्ट प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांनी युतीचे संकेत दिले होते. त्या व्हायरल व्हिडीओचे उद्धव ठाकरे यांच्याकडून समर्थन करत त्यांनीही युतीबाबत सकारात्मक चिन्हे दर्शवली होती. तेव्हापासूनच हे दोन्ही बंधू एकत्र कधी येणार याची चर्चा रंगली होती. अखेर वरळी येथे मराठी माणसांसाठी मराठीच्या मेळाव्यात ठाकरे बंधू २० वर्षांनंतर एकत्र दिसले. त्यानंतर अनेक कौटुंबिक कार्यक्रमांत ठाकरे बंधू एकत्र आले होते. आता निवडणुकांच्या रणधुमाळीत ते एकत्र असणार का, याचे तर्क-वितर्क लावले जात असताना अखेर आज राज आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.