"वाटलेल्या नोटांमुळे 'नोटा'चाही अधिकार गेला" ; राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर व्हिडिओ लाँच

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर व शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून ती दोन भागांत प्रदर्शित होणार आहे.
"वाटलेल्या नोटांमुळे 'नोटा'चाही अधिकार गेला" ; राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर व्हिडिओ लाँच
Published on

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंची युती या निवडणुकीसाठी लक्षवेधी ठरत आहे. अशातच, २० वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची आगामी संयुक्त मुलाखत चर्चेत आली आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर व शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली असून या मुलाखतीचा पहिला टीझर बुधवारी (दि.७) सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत बोलताना "वाटलेल्या नोटांमुळे 'नोटा'चाही अधिकार गेला", असा घणाघात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या संयुक्त मुलाखतीत करतात. याशिवाय अन्य अनेक मुद्द्यांवर ठाकरे बंधू परखडपणे व्यक्त होताना दिसत आहेत.

"भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नयेत"

टीझरच्या सुरुवातीलाच, "महाराष्ट्राला २० वर्षे वाट (ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी) का पाहावी लागली?" असा प्रश्न संजय राऊत विचारतात. "मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं यासाठी सगळ्यांचा खटाटोप चालू आहे," असे राज ठाकरे म्हणतात. त्यानंतर, "ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे का" अशी विचारणा राऊत करतात. त्यावर उत्तर देताना, "भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नयेत" असे राज ठाकरे म्हणतात. तर, पुढे उद्धव ठाकरे "राज्यकर्त्यांचं प्रेम हे राज्यावर असायला हवं, सत्तेवर नाही." असं म्हणत त्यांची भूमिका मांडतात.

ही सर्व बसवलेली माणसं...पुणे लवकरच बरबाद होईल

पुढे, "ही सर्व बसवलेली माणसं आहेत सगळी, यातला बसलेला माणूस कोणीच नाही आणि बसवलेला जो माणूस असतो ना तो फक्त धन्याचं ऐकतो," असा हल्लाबोल राज ठाकरे करताना पाहायला मिळते. तर, "एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातून बाहेर पडतो ना तेव्हा खरं सांगायचं तर मला लाज वाटते" असे महेश मांजरेकर म्हणतात. त्यावर, राज ठाकरे, "मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला...पुणे ते बघणार नाही...पुणे लवकरात लवकर बरबाद होईल," असे रोखठोकपणे सांगतात.

आमच्याकडे फक्त तक्रार, मतं नाहीत

साताऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ड्रग्ज सापडल्याचे संजय राऊत सांगतात. त्यावर, "लोकांनी जर मतदानातून राग व्यक्त केला नाही, तर अशी परिस्थिती होईल की, ते म्हणतात ना, राजाने मारलं काय पावसानं झोडलं काय? तक्रार कोणाकडे करायची?" असे राज ठाकरे म्हणतात. लगेच संजय राऊत, "तुमच्याकडे करणार लोकं तक्रार" असे सांगतात. त्यावर, "म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार, मतं नाहीत" असे राज ठाकरे म्हणतात.

मुंबईत जन्माला आल्याशिवाय काय पाहिजे ते कळणार नाही

याशिवाय, "सगळ्यात मोठं संकट गौतम अदाणी मुंबई गिळतोय," असा घणाघात संजय राऊत करताना दिसतात. एका प्रश्नाच्या उत्तरात "दुर्दैवाने मी असं म्हणेन, आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीयेत, अशी भूमिका मांडताना उद्धव ठाकरे पाहायला मिळत आहेत. तर "मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे, हे तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही," असे राज ठाकरे म्हणत आहेत. "काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे," असंही राज ठाकरे सांगताना दिसतायेत.

"वाटलेल्या नोटांमुळे 'नोटा'चाही अधिकार गेला" ; राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर व्हिडिओ लाँच
वचननाम्यात ‘मराठी’ ऐवजी ‘मुंबईकर’ का? राज ठाकरे म्हणाले, "मराठी माणूस लिहिलं तर...

वाटलेल्या नोटांमुळे 'नोटा'चाही अधिकार गेला

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या मुद्दयावर महेश मांजरेकर म्हणतात, "हे असे निर्विवाद आले त्यांनी मतदान केलेलं बोट कसं दाखवायचं? " त्यावर राज आणि उद्धव एकाचवेळी, "वाटलेल्या नोटांमुळे झालेला हा प्रॉब्लेम आहे" असे म्हणतात. पुढे, "वाटलेल्या नोटांमुळे 'नोटा'चाही अधिकार गेला" अशी टीका राज ठाकरे करतात.

ठाकरे बंधूंची ही मुलाखत सध्या महाराष्ट्रात चर्चेत असून या मुलाखतीचा पहिला भाग गुरुवारी ८ जानेवारी तर दुसरा भाग ९ जानेवारीला प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in