

राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी अर्थात उद्या मतदान होणार असून, लाखो मतदार मतदानासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आणि वैध फोटो ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
Voter ID नसेल तर...
अनेक नागरिकांमध्ये नेमके कोणते ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले जातात, याबाबत संभ्रम आहे. याशिवाय, अनेक वेळा मतदारांकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नसते किंवा ते गहाळ झालेले असते. अशा वेळी मतदान करता येईल की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळेच, बीएमसी निवडणुकीसाठी मतदान करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पर्यायी कागदपत्रे ग्राह्य
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदारांकडे निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र नसेल, तर ओळख पटवण्यासाठी पर्यायी कागदपत्रे ग्राह्य धरली जातात. या यादीत आधार कार्डसह इतर अधिकृत कागदपत्रांचा समावेश आहे. यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र दाखवून तुम्ही मतदान करू शकता. मतदानासाठी मतदार मान्यताप्राप्त फोटो ओळखपत्र घेऊन येऊ शकतात.
मान्यताप्राप्त ओळखपत्रांची यादी:
पासपोर्ट
आधार कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
पॅन कार्ड
केंद्र/राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी जारी केलेली फोटोयुक्त सेवा ओळखपत्रे
छायाचित्रासह बँक/पोस्ट ऑफिस पासबुक
एनपीआर अंतर्गत RGI ने जारी केलेले स्मार्ट कार्ड
मनरेगा जॉब कार्ड
कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड
पेन्शनकार्ड
छायाचित्रासह असलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखला
टीप: स्वतंत्र ओळखपत्र म्हणून वोटर स्लिप स्वीकारली जाणार नाही.