

मुंबई : वांद्रे पाली हिल परिसरातील टिप अँड टो लक्स सलून चालकाने वडाच्या झाडाला रासायनिक रंग फासल्याने खळबळ उडाली आहे. सलून चालकाने केलेल्या कृत्याचा परिसरातील नागरिक व पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेच्या एच-पश्चिम विभागाच्या उद्यान विभागाने वांद्रे पोलिसांना पत्र लिहित संबंधित सलूनविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबईत विविध प्राधिकरणाची कामे सुरू असून कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात येते. मात्र, पाली हिल येथील ‘टिप अँड टो लक्स’ या सलूनने वडाच्या खोडावर व लोंबकळणाऱ्या फांद्यांवर गुलाबी व हिरव्या रंगाचे रासायनिक स्प्रे पेंट केल्याचे उघडकीला आले आहे.
रंग झाडाच्या सालावर फवारल्यामुळे सूक्ष्म छिद्रे बंद करून झाडाच्या श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात. ज्यामुळे झाडाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते, असे पालिकेने सलूनला पाठवलेल्या नोटिशीत आणि पोलीस ठाण्याला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
झाडाला हानी पोहोचवणे म्हणजेच झाड तोडणे
महाराष्ट्र झाड संरक्षण कायदा, १९७५ अंतर्गत झाडाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवणे हे ‘झाड तोडणे’ या परिभाषेत येते. संबंधित कायद्यानुसार, हा दखलपात्र गुन्हा असून दोषींना एक वर्षापर्यंत कारावास किंवा एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. दरम्यान, सलूनला झाडावरील रंग टाकण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.