
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे विजयी मेळाव्यात एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसत आहेत. या मेळाव्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. विशेषतः भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आज विधिमंडळाच्या आवारात बोलताना, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रश्न उपस्थित करत, थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “दोन भाऊ काय, चार भाऊ आले तरी आम्ही तयार आहोत” असं म्हणत त्यांनी थेट आमनेसामने लढाईचं आव्हान दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा -
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत प्रसाद लाड यांनी म्हंटले, की ''एखाद्या मुख्यमंत्र्याला जेव्हा अहवाल दिला जातो, ते वाचणं त्या मंत्र्यांचं काम असतं. जर ते म्हणत असतील, की मी तो वाचलाच नाही तर किती षंढ मुख्यमंत्री ते होते? हे लोकांसमोर येईल. माझं मत तर एवढंच आहे, जो जीआर तुम्ही काढला, त्यावर आम्ही जीआर काढला. त्या जीआरमध्ये स्पष्टपणे म्हंटलं 'हिंदी, इंग्रजी व इतर भाषा या ऑप्शनल असतील. मराठी ही Compulsory असेल.' निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा बाऊ करून राजकारण करायचं आणि मग 'म' मराठीचा नव्हे, महानगरपालिकेचा करायचा. हा जो प्रकार आहे, तो प्रकार उद्धव ठाकरे यांनी थांबवला पाहिजे आणि राज ठाकरे बाबतची त्यांची भूमिका काय? हे जनतेसमोर जाहीर केले पाहिजे.''
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका -
लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करत म्हंटले, की ''परवाच्या दिवशी जे तुम्ही भाषण बघितलं, तर ते पुन्हा अहंकाराचं भाषण होतं. परवाचं भाषण पुन्हा राजकीय भाषण होतं. खंजीर खुपसणे, पाठीत मारलं, ह्याव केलं-त्याव केलं, बाप पळवला, गद्दार आहेत याच्या पलिकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाही. भाषण तुम्ही तिकडे कव्हर करायला होतात, उद्धव ठाकरे यांच्या अख्ख्या भाषणात एक तरी भूमिका मराठीची किंवा मराठी भाषेची आली का? हे तुम्ही मला बोलून दाखवा. भाषणामध्ये मराठी भाषेचा आदर, मराठी भाषेचा सत्कार, मराठी भाषेचा विजय यावर ते बोलले नाहीत. तर, गद्दार, धोका, खंजीर याच्या पलीकडे ते काही बोलले नाहीत. तो व्हिडिओ बघितला तर मला वाटतं भाषण ऐकून राज ठाकरे अचंबित झाले होते.''
राज ठाकरे यांचा अपमान -
पत्रकारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल मत विचारले असता प्रसाद लाड म्हणाले, की ''राजकारणांमध्ये कोण कुठे जाईल हे मला माहीत नाही. राज साहेबांबद्दल काहीही बोलणं मी माझ्यासाठी योग्य समजत नाही. जे आहे ते वेळ कळवेल. परंतु, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा अपमान केला, ज्या पद्धतीमध्ये मनसेचा अपमान केला गेला...माझे सर्वच मित्र आहेत, बाळा नांदगावकर असतील, संदीप असेल, नितीन असेल सर्वच मित्र आहेत. मी यांनाच विचारू इच्छितो की झालेला अपमान तुम्ही विसरलात का? आणि जर विसरला नसाल तर याचं तुम्ही उत्तर देणार आहात का? उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची माफी मागणार आहेत का? मला वाटत नाही. कारण राज ठाकरे स्वाभिमानी नेते आहेत.
पुढे ते म्हणाले, की ''दोन भाऊ एकत्र आले तर स्वागत आहे. एक बार हो जाये महासंग्राम. आम्हीही वाट पाहतोय. राजकारण आहे. कुठला पक्ष कोणाबरोबर लढायचा? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.'' तसेच भाजप या परिस्थितीत या दोन पक्षांसोबत अथवा भावांसोबत लढणार का? या प्रश्नावर लाड म्हणाले, ''भाजप का तयार नसणार? भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. दोन भाऊ नाही, उरलेले चार-पाच एकत्र आलेले चालतील. जे उरलेत ना दोन-तीन तेही एकत्र आणा, भाचे आणा, पुतणे आणा. एकत्र लढा. आमची मागणी आहे, की एकत्र लढा. आम्हाला कळून जाऊदे काय करायचं आहे ते.''
आदित्य ठाकरे यांना स्वत:चा नैतिक अधिकार नाही - लाड
आदित्य ठाकरे यांनी भाजपला प्रश्न विचारला, की ''मासांहार करतात म्हणून मराठी माणसं वाईट आहेत, अशी टीका करण्यात आली तेव्हा भाजप कुठे होतं?'' या प्रश्नावर उत्तर देताना लाड म्हणाले, की ''आदित्य ठाकरेने प्रथमत: स्वत:च्या मतदार संघात बांधलेली एक महानगरपालिकेची शाळा, ज्याच्या भिंतीवर लिहिलेली उर्दूमधली वाक्य आणि उर्दूमध्ये काढलेली चित्र याच्यावर पहिलं उत्तर द्यावं. त्यानंतर मराठी माणसावर आणि हिंदुत्वावर बोलावं. आदित्य ठाकरे यांना स्वत:चा नैतिक अधिकार नाही. आदित्य ठाकरेने स्वत: कुठलीही भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही. स्वत:च्या वरळीमध्ये त्यांनी शाळेत लिहिलेलं उर्दूमध्ये ते काळ्या रंगाने खोडवं नंतर आम्हाला प्रश्न विचारावे.''