BMC Election : मुंबईतील पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने; आशा काळे यांचा विजय

मुंबईतील पहिला निकाल आला असून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. यासोबतच काँग्रेसने मुंबईत आपले खाते उघडले आहे.
BMC Election : मुंबईतील पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने; आशा काळे यांचा विजय
Published on

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.१५) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (दि.१६) सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीतील पहिला निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये, काँग्रेसच्या आशा काळे यांनी वॉर्ड क्रमांक १८३ मधून विजय मिळवला आहे. आशा काळे यांनी एकूण ५,४०६ मते मिळवत १,४५० मतांची आघाडी घेत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांचा पराभव केला.

काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर

आशा काळे या एकूण सहा उमेदवारांविरुद्ध मैदानात उतरल्या होत्या. निवडणुकीच्या लढतीत धारावीतील या प्रभागात काँग्रेस, मनसे आणि भाजप यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच काँग्रेसच्या आशा काळे यांनी आघाडी घेतली होती. शेवटी, त्यांनी मनसेच्या उमेदवार पारूबाई कटके यांचा पराभव करत हा प्रभाग काँग्रेसकडे कायम राखला. याशिवाय, मुंबईत काँग्रेसचे १५ पेक्षा जास्त उमेदवार आघाडीवर आहेत.

वैशाली शेवाळेंचा पराभव

शिवसेना शिंदे गटाने या प्रभागातून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी माजी नगरसेविका वैशाली शेवाळे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना या निवडणुकीत ४,१६६ मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे.

धारावी - काँग्रेसचा बालेकिल्ला

आशा काळे या माजी काँग्रेस नगरसेवक दीपक काळे यांच्या पत्नी आहेत. या विजयामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पहिले यश मिळाले आहे. धारावी हा काँग्रेस तसेच गायकवाड कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जात असून, याच वॉर्डमधून काँग्रेसने आपल्या विजयाचा गुलाल उधळला आहे.

हा विजय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा

विजयानंतर आशा काळे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या, “आपल्या खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार डॉ.ज्योती गायकवाड यांच्या पाठिंब्यामुळे आणि आशीर्वादामुळेच हा विजय मिळवता आला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही ही जागा जिंकू शकलो. हा विजय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे. माझे पती माजी नगरसेवक दीपक काळे यांच्या सहकार्याने हा विजय मिळवता आला.त्यांनी या भागात १० वर्षांपासून केलेल्या कामांचा हा विजय आहे.”

वॉर्ड १८३ - अनुसूचित जाति (महिला) राखीव

धारावीतील वॉर्ड क्रमांक १८३ (G/North) हा मुंबईतील २२७ वॉर्डपैकी एक असून हा अनुसूचित जाती (महिला) राखीव वॉर्ड आहे. या वॉर्डची एकूण लोकसंख्या ४९ हजारांहून अधिक आहे.

१ कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबईतील २२७ वॉर्डांसाठी गुरुवारी (दि. १५) मतदान पार पडले. सुमारे एक कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व निकाल आज सायंकाळपर्यंत जाहीर होणार आहेत.

एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत

एक्झिट पोलनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटाची महायुती या निवडणुकीत आघाडीवर आहे. तर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या पक्षांना बहुमताच्या तुलनेत कमी जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

BMC Election : मुंबईतील पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने; आशा काळे यांचा विजय
Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर; कोणत्या जिल्ह्यात कोण अव्वल?

तथापि, बीएमसीवर सत्ता स्थापन करण्यासाठी किमान ११४ जागांची आवश्यकता आहे. या वेळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी युती करून निवडणूक लढवली, तर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली.

logo
marathi.freepressjournal.in