

मुंबईतील खड्डे, कचरा, पाणीपुरवठा, गटार, रस्ते यांसारख्या नागरी समस्यांबाबत तक्रार करणे आता अधिक सोपे होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खड्ड्यांच्या तक्रारींसाठी वापरले जाणारे 'Pothole QuickFix' ॲप आता 'MyBMC MARG' या एकत्रित तक्रार निवारण ॲपमध्ये समाविष्ट केले आहे.
यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांसाठी स्वतंत्र ॲप वापरण्याची गरज राहणार नाही. आता सर्व प्रकारच्या नागरी तक्रारी एकाच ॲपद्वारे नोंदवता येणार आहेत.
खड्ड्यांसह ११४ प्रकारच्या तक्रारींची सुविधा
'MyBMC MARG' हे BMC चे तक्रार निवारण ॲप असून त्यामध्ये तब्बल ११४ प्रकारच्या नागरी तक्रारी नोंदवण्याची सुविधा आहे. यामध्ये खड्डे, कचरा व्यवस्थापन, गटार समस्या, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, उद्याने, सार्वजनिक आरोग्य, कीटक नियंत्रण, अतिक्रमण आणि रस्त्यावरील दिवे यांसारख्या तक्रारींचा समावेश आहे.
फोटो अपलोड करून करता येणार तक्रार
नागरिकांना तक्रार करताना संबंधित ठिकाणाचा फोटो, अचूक लोकेशन आणि इतर माहिती अपलोड करता येणार आहे. तक्रार नोंदवल्यानंतर तिची स्थिती, संबंधित विभागाने केलेली कारवाई आणि तक्रार निकाली निघेपर्यंतची माहितीही ॲपवर पाहता येणार आहे.
BMC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या सुविधेमुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख होणार आहे.
नागरिकांना BMC चे आवाहन
महापालिकेने मुंबईकरांना खड्डे किंवा इतर नागरी समस्यांबाबत तक्रार करताना स्पष्ट फोटो आणि अचूक ठिकाणाची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे संबंधित विभागाला तातडीने कारवाई करणे सोपे होईल.
'MyBMC MARG' ॲप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून नागरिकांनी सर्व नागरी तक्रारींसाठी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन BMC ने केले आहे.