

दिल्लीतील CJP नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांनी आज (दि. ११) मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलनाची हाक दिली आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथील टी-जंक्शनवर शांततेत एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केले आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या घडामोडींचा व्हिडीओ समोर आला आहे.
अजिंक्य शिंदे यांचे ट्विट
अजिंक्य शिंदे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. प्रत्येक भारतीयाला आपला प्रिय देश मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वाखाली हुकूमशाहीकडे जात असल्याचा राग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीसह देशभरात हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करत, या कारवाईविरोधातील आंदोलन थांबणार नसल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
शिंदे यांनी मुंबईकरांना आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथील टी-जंक्शनवर शांततेत एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. देशातील इतर शहरांमध्येही लवकरच आंदोलन सुरू होईल, असे त्यांनी म्हटले आहे. नेत्यांना ताब्यात घेऊन लोकशाहीवर निर्बंध आणण्याची मोठी चूक सरकारने केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP कडून आंदोलन करण्यात येत आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत कथित अनियमितता असल्याचा आरोप करत पक्षाने ही मागणी लावून धरली आहे. आपल्या पोस्टच्या शेवटी शिंदे यांनी Gaddar Gyaanu Must Resign! अशी घोषणा देत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दिल्लीतील नेत्यांच्या ताब्यामुळे आंदोलनाला नवे वळण
दिल्लीमध्ये जंतर-मंतर येथे नियोजित आंदोलनापूर्वी CJP चे अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातून उतरल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यूट्यूबर ध्रुव राठी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले होते. या कारवाईनंतर CJP ने आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली असून, दिल्लीतील आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
मुंबईत आंदोलनाचे आवाहन करण्यात आल्यानंतर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात CJP च्या मागण्यांच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनांप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. शिवाजी पार्क येथे आज होणाऱ्या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि पोलिसांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.