Mumbai : पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

नवी मुंबईतील ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात फरार असलेले निवृत्त IAS अधिकारी दिलीप खेडकर यांना अखेर न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
Mumbai : पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
Published on

नवी मुंबईतील ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात फरार असलेले निवृत्त IAS अधिकारी दिलीप खेडकर यांना अखेर न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

ट्रक क्लिनरचे किरकोळ वादातून अपहरण

१२ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील मुलुंड-ऐरोली लिंक रोडवर दिलीप खेडकर यांच्या लँड क्रूझर गाडीला एका काँक्रीट मिक्सर ट्रकचा हलका धक्का लागला. त्या ट्रकमध्ये २२ वर्षीय प्रल्हाद कुमार हा क्लिनर होता. धक्का लागल्यानंतर खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकाने संतापाच्या भरात प्रल्हादला मारहाण केली आणि त्याला 'पोलीस ठाण्यात नेतो' असं सांगत जबरदस्तीने गाडीत बसवून नेलं, असा गंभीर आरोप आहे.

दिलीप खेडकर फरार

या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण, मारहाण आणि धमकी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांखाली खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकावर गुन्हा दाखल केला. १४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी खेडकर यांच्या घरातून प्रल्हाद कुमारला सुरक्षित सोडवलं, मात्र त्यानंतर खेडकर फरार झाले. त्यांचा ६ ऑक्टोबर रोजी अटकपूर्व जामीन फेटाळला गेला, परंतु अखेर १६ ऑक्टोबरला उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

पत्नी मनोरमा खेडकरविरोधातही गुन्हे

दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांच्याविरोधातही पोलिस तपास सुरु आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तपासात सहकार्य न करता अडथळा आणला आणि नोटीस मिळूनही वेळेवर उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप न्यायालयात दाखल केला. मनोरमा खेडकर यांना १५ दिवसांपूर्वी स्थानिक न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला होता, मात्र याबाबतची माहिती पोलिसांकडे नव्हती, अशी कबुलीही नंतर देण्यात आली.

खेडकर कुटुंबावर पुन्हा संशयाचे सावट

ही घटना वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या कुटुंबाला पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणते आहे. मनोरमा खेडकर यांच्याविरोधात पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आधीच बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्तेवर कब्जा मिळवण्याचे गुन्हे नोंद आहेत. तसेच त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांशी उर्मट वर्तन केल्याच्या तक्रारी आणि परिसरात दहशत निर्माण केल्याचे आरोप देखील समोर आले आहेत.

पूजा खेडकर वादानंतर पालकांवरही आरोप

IAS पूजा खेडकर या स्वतः नियमभंग, नियुक्ती प्रक्रियेत फसवणूक आणि शासकीय गैरवर्तनाच्या आरोपांमुळे निलंबित आहेत. आता त्यांच्या पालकांवरदेखील गंभीर गुन्हे दाखल झाल्याने संपूर्ण खेडकर कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

logo
marathi.freepressjournal.in