

मुंबईतील वांद्रे स्थानकाजवळील गरीब नगर येथे सुरू असलेल्या पाडकाम मोहिमेचं सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. ही कारवाई “मानवी दृष्टिकोन ठेवून” संवेदनशीलपणे केली जात असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितलं की, “पाडकामाचं काम सातत्याने सुरू आहे. काल संध्याकाळपर्यंत सुमारे ६० टक्के काम पूर्ण झालं होतं, तर आजपर्यंत जवळपास ८५ टक्के पाडकाम पूर्ण झालं आहे.”
“मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई”
या कारवाईत मानवी बाजू अत्यंत संवेदनशील असल्याचं सांगत अभिषेक म्हणाले की, प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक ही मोहीम राबवत आहे.
“या प्रकरणात मानवी पैलू जोडलेला आहे. आम्ही संयम राखत आहोत आणि कोणालाही इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आहोत. जड यंत्रसामग्री वापरली जात असल्याने सर्व सुरक्षा नियमांचं पालन केलं जात आहे,” असं त्यांनी सांगितलं.
२ हजारांहून अधिक पाण्याच्या बाटल्या आणि जेवण वाटप
स्थळी उपस्थित नागरिकांना मदत म्हणून २ हजारांहून अधिक पाण्याच्या बाटल्या आणि पॅकबंद जेवणाचं वाटप करण्यात आल्याचंही अभिषेक यांनी सांगितलं.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई
“मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश अत्यंत स्पष्ट आणि कठोर आहे. ओळख पटलेल्या १०० बांधकामांव्यतिरिक्त इतर सर्व बांधकामं बेकायदेशीर असून ती हटवणं आवश्यक आहे. आम्ही त्याच आदेशाची अंमलबजावणी करत आहोत,” असं अभिषेक यांनी स्पष्ट केलं.
दगडफेक आणि तणावावरही प्रतिक्रिया
पाडकामादरम्यान झालेल्या दगडफेक आणि आंदोलनाबाबत बोलताना अभिषेक म्हणाले, “१० ते १५ मिनिटांसाठी तणाव निर्माण झाला होता. मात्र आमच्या पथकाने योग्यरित्या परिस्थिती हाताळली आणि अल्पावधीतच परिस्थिती नियंत्रणात आणली.”
मंगळवारी कथित बेकायदेशीर धार्मिक बांधकाम हटवण्यात आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. स्थानिकांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या प्रकरणात सुमारे १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून एका पोलिस कर्मचाऱ्यालाही दुखापत झाली होती.
१०० कुटुंबांच्या पुनर्वसनाची शक्यता
दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या सुमारे १०० पात्र झोपडपट्टीधारक कुटुंबांचं पुढील चार महिन्यांत पुनर्वसन होण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
पश्चिम रेल्वेने नुकतंच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (MMRDA) पुनर्वसन प्रस्तावाबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे.
गरीब नगरमध्ये सुमारे ५०० झोपड्या असून रेल्वे प्रशासनाने त्यापैकी केवळ १०० कुटुंबांना पुनर्वसनासाठी पात्र ठरवलं आहे. पाडकाम मोहिमेनंतर अनेक रहिवाशांमध्ये भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.