Gudi Padwa 2026 : गिरगाव ते ठाणे; गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसाठी 'ही' आहेत बेस्ट ठिकाणे
(Photo- Instgram)

Gudi Padwa 2026 : गिरगाव ते ठाणे; गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसाठी 'ही' आहेत बेस्ट ठिकाणे

या शोभायात्रांमध्ये पौराणिक देखावे, सजवलेले रथ, बाईक रॅली, सामाजिक संदेश देणारे उपक्रम आणि निधी संकलन उपक्रम देखील पाहायला मिळतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी या मिरवणुका पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.
Published on

उद्या १९ मार्चला असणाऱ्या गुढीपाडव्याचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. सण साजरा करण्यासाठी मुंबईकर शहरात होणाऱ्या भव्य शोभायात्रांच्या तयारीत मग्न आहेत. पारंपरिक मराठमोळ्या रंगात नटलेल्या या मिरवणुका म्हणजे गुढीपाडव्याचे मोठे आकर्षण मानल्या जातात.

नऊवारी साड्यांतील महिला, फेटे बांधलेले पुरुष, ढोल पथक, लेझीम, सांस्कृतिक सादरीकरण आणि उत्साहाने भरलेले रस्ते अशा वातावरणात शहरातील अनेक भागांत उत्साहाचे वातावरण असते. या शोभायात्रांमध्ये पौराणिक देखावे, सजवलेले रथ, बाईक रॅली, सामाजिक संदेश देणारे उपक्रम आणि निधी संकलन उपक्रम देखील पाहायला मिळतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी या मिरवणुका पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.

Gudi Padwa 2026 : गिरगाव ते ठाणे; गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसाठी 'ही' आहेत बेस्ट ठिकाणे
Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळ का खातात? जाणून घ्या खरं कारण

मुंबई-ठाण्यातील प्रमुख शोभायात्रांची ठिकाणे

गिरगाव :

गिरगावमधील गुढीपाडव्याची शोभायात्रा ही मुंबईतील सर्वात प्रतिष्ठेच्या मिरवणुकांपैकी एक मानली जाते. यंदा या उत्साहात आणखी भर पडणार आहे, कारण प्रजासत्ताक दिन परेड २०२६ मधील महाराष्ट्राच्या पुरस्कारप्राप्त चित्ररथाचा समावेश या उत्सवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरगावची मिरवणूक यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे.

Gudi Padwa 2026 : गिरगाव ते ठाणे; गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसाठी 'ही' आहेत बेस्ट ठिकाणे
Gudi Padwa 2026 : सणासुदीला खास गोड पदार्थ; घरच्या घरी तयार करा नारळाचे मोदक

शिवाजी पार्क :

दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील शोभायात्रा मोठा उत्सवासाठी ओळखली जाते. येथे संगीत, नृत्य, पारंपरिक वेशभूषा आणि प्रचंड उत्साहाने भरलेले वातावरण अनुभवायला मिळते. मात्र येथे गर्दीचे प्रमाण जास्त होत असल्याने त्याची तयारी ठेवावी लागते.

गणेश मंदिर, डोंबिवली :

डोंबिवलीत गणेश मंदिर परिसरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे गुढी उभारून कार्यक्रमाची सुरुवात होते. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरणपोळी, श्रीखंड, आमरससारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी येथे मिळते.

राम मारुती मंदिर, ठाणे :

ठाण्यातील स्वागत यात्रा अत्यंत प्रसिद्ध आहे. ही मिरवणूक कोपिनेश्वर मंदिराजवळ सुरू होऊन तलावपाळी परिसरातून पुढे जाते. या यात्रेत सजवलेले देखावे, बाईक रॅली आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणे हे विशेष आकर्षण असते.

कल्याण :

बहुतेकवेळा दुर्लक्षित राहणारी पण तितकीच भव्य अशी कल्याणची शोभायात्राही पाहण्यासारखी असते. ही मिरवणूक कमिशनर बंगल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे दुर्गाडी किल्ल्याच्या रस्त्याकडे जाते. इथे तुलनेने कमी गर्दीत मोठा उत्सव अनुभवता येतो.

इतर भागांतही उत्सवाचा जल्लोष :

याशिवाय लालबाग, विले पार्ले आणि घाटकोपर या भागांतही लहान-मोठ्या शोभायात्रा आणि स्थानिक उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे शहरभर गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळतो.

Gudi Padwa 2026 : गिरगाव ते ठाणे; गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसाठी 'ही' आहेत बेस्ट ठिकाणे
Gudi Padwa 2026 : गुढी पाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

शोभायात्रेला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

  • मुख्य मिरवणूक पाहायची असेल तर सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहचा.

  • सकाळपासूनच उकाडा आणि आर्द्रता जाणवू शकते, त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा.

  • गर्दीत हेव्ही पारंपरिक कपडे त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे सोयीस्कर वेशभूषा निवडा.

  • या भागांत पार्किंगची मोठी अडचण होऊ शकते, त्यामुळे शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.

  • गर्दीमध्ये स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

logo
marathi.freepressjournal.in