मुंबईत पसरला अंधार! मुसळधार पावसाचा तडाखा; रेल्वे उशिरा, ट्रॅकवर आणि रस्त्यावर पाणीच पाणी, सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, रविवारी रात्रीपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विशेषतः मुंबई व परिसरात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुंबईमध्ये सर्वत्र अंधार पसरला आहे. गेल्या १५ वर्षात पहिल्यांदा लवकर पावसाचे आगमन झाले आहे.
मुंबईत पसरला अंधार! मुसळधार पावसाचा तडाखा; रेल्वे उशिरा, ट्रॅकवर आणि रस्त्यावर पाणीच पाणी, सतर्कतेचा इशारा
Published on

महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, रविवारी रात्रीपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विशेषतः मुंबई व परिसरात पावसाने अक्षरशः कहर केला आहे.

मुंबईमध्ये सर्वत्र अंधार पसरला आहे. गेल्या १५ वर्षात पहिल्यांदा लवकर पावसाचे आगमन झाले आहे. तर यंदा पहिल्याच दिवशी पडलेल्या पावसाने १०७ वर्षांचा विक्रम मोडला. कुलाबा वेध शाळेनुसार २९५ मीमी इतका पाऊस पडला आहे. १९१८ साली २७९.४ मीमी पावसाची नोंद करण्यात आली होती.

मुंबई व उपनगरात वाहतूक व्यवस्था कोलमडली

मुंबई उपनगरात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. कर्जत, खोपोली आणि बदलापूर येथून मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या, तर मुंबईहून कल्याण व कर्जतकडे जाणाऱ्या गाड्यांनाही १० ते १५ मिनिटांचा विलंब झाला.

(छायाचित्र सौ. PTI)
(छायाचित्र सौ. PTI)

पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांची वाहतूक मंदावली आहे. कमी दृश्यमानतेमुळे रस्त्यावरची वाहतूकही संथ झाली असून, कामावर जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.

वाहतूक कोंडी आणि नागरिक हैराण -

पावसाळा सुरू होण्याआधीच मुंबईचे रस्ते पूर्णपणे तुंबले. रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल्याने पूर्णपणे वाहतूक कोंडी निर्माण झाली. दादर किंग्ज सर्कल, हिंदमाता, बांद्रा, परळ, कुर्ला, मंत्रालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रस्त्यावर पाणी साचले. सकाळी ९ ते १० दरम्यान केवळ एक तासात नरिमन पॉइंटमध्ये सर्वात जास्त पाऊस पडला. येथे १०४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर कुलाबा येथे ८३ मिमी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ८० मिमी, मलबार हिल येथे ६३ मिमी पाऊस पडला. बोरिवली, सांताक्रूझ, पवई, मुलुंड, चेंबूर, वरळी, कुलाबा आणि तसेच नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण येथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. रस्त्यासोबतच आता केइएम हॉस्पिटलमध्येही पाणी साचले आहे.

वीजपुरवठ्यावर परिणाम, अंबरनाथ-बदलापूरमध्ये अंधार

बदलापूर, अंबरनाथ व आसपासच्या परिसरात पावसासोबत वादळी वाऱ्यांचा आणि विजांचा कडकडाट होत आहे. यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना अंधारात दिवस काढावा लागत आहे.

हवामान खात्याचे इशारा आणि अलर्ट

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर व उपनगरांसाठी रेड अलर्ट तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागांत ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून पुढील तीन ते चार तासांत जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, २६ ते २८ मे दरम्यान मुंबईत सतत पावसाची शक्यता असून आकाश ढगाळ राहील. तापमान २३°C ते ३१°C दरम्यान राहणार आहे. २९ मेनंतर पावसाची तीव्रता काहीशी कमी होईल, मात्र ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. ३० आणि ३१ मे रोजी अंशतः ढगाळ वातावरणासह हलकासा पाऊस होऊ शकतो आणि तापमान ३३°C पर्यंत वाढू शकते.

ठाण्यात वाहतूक कोंडी, रस्त्यांची दयनीय अवस्था

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-वाडा रस्त्यावर पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग अत्यंत मंदावला असून रस्त्याचे सुरू असलेले बांधकाम परिस्थिती अधिकच बिकट करत आहे. ही कोंडी सुमारे ७ ते ८ किलोमीटरपर्यंत पसरली असून अनेक प्रवासी चार तासांहून अधिक वेळ वाहनांत अडकून राहिले.

पुणे जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती, एनडीआरएफ तैनात

कोकणासह पुणे जिल्ह्यातही पावसाने मोठा परिणाम केला आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यांत अतिवृष्टी झाल्यामुळे काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफचे विशेष पथक घटनास्थळी दाखल करण्यात आले आहे.

बारामतीमध्ये ८३.६ मिमी तर इंदापूरमध्ये ३५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. इंदापूरजवळील पुणे-सोलापूर महामार्गावर पाणी साचल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती. इंदापूरमधील सुमारे ७० गावांमध्ये आणि बारामतीतील १५० घरांमध्ये पाणी शिरले असून स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढत असून, मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणात जनजीवनावर परिणाम झाला आहे. रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक, वीजपुरवठा यावर परिणाम जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांनुसार पुढील काही दिवस सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in