वरळीत ‘हिट ॲण्ड रन’; बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, शिंदे गटातील नेत्याच्या मुलाचा घटनेनंतर पळ
मुंबई : पुण्यानंतर वरळी परिसरात रविवारी सकाळी ‘हिट ॲण्ड रन’च्या घटनेने एकच खळबळ उडाली. भरवेगात जाणाऱ्या एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिल्याने कावेरी प्रदीप नाखवा या ४५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती प्रदीप लीलाधर नाखवा यांना किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा, राजेंद्रसिंग बिडावतला या दोघांना ताब्यात घेतले आहे. अपघातात मिहीर शहा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अपघातानंतर शिवसेनेचे युवा अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन नाखवा कुटुंबीयांचे सांत्वन केले. प्रदीप नाखवा हे वरळीतील कोळीवाडा परिसरात राहत असून त्यांचा मासेविक्रीचा व्यवसाय आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने सकाळी प्रदीप हे त्यांची पत्नी कावेरीसोबत मासे आणण्यासाठी मनीष मार्केटमध्ये गेले होते. सव्वापाच वाजता ते वरळीच्या दिशेने येत होते. यावेळी सीजे हाऊस येथे भरवेगात जाणाऱ्या एका बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत कावेरी या कारच्या बोनेटवर पडल्या. यावेळी प्रदीप यांनी त्याला कार थांबविण्यास सांगितले होते, मात्र कारचालकाने अचानक ब्रेक मारल्याने ते दोघेही खाली पडले. यावेळी कारच्या चाकाखाली आल्याने कावेरी यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना कारचालकाने काही अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातानंतर कारचालक तेथून पळून गेला.
जखमी झालेल्या कावेरी यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी प्रदीप नाखवा यांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
अपघाताच्या वेळेस मिहीर शहा हा कार चालवत होता, मात्र अपघातानंतर तो पळून गेला. त्याच्या बाजूला राजेश शहा हा बसला होता. कावेरी यांना सी-लिंकपर्यंत फरफटत नेल्यानंतर मिहीरने ब्रेक लावला व तो सी-लिंकवरून पळून गेला. अपघातानंतर त्याचा मोबाईल बंद आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या चार टीम रवाना झाल्या आहेत. दुसरीकडे एका टीमने सी-लिंकवरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
मिहीरने बारमध्ये पार्टी केल्याचे उघड
तपासात मिहीरने शनिवारी रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसोबत पार्टी केली होती. या पार्टीचे बिल मिहीरच्या मित्रांनी दिले होते. त्यामुळे पोलीस पथकाने या बारच्या मॅनेजरची चौकशी केली. बारमधील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवर एकनाथ शिंदे गटाचे चिन्ह होते. अपघातानंतर गाडीवरील चिन्ह पुसण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच कारच्या मागील नंबरप्लेट काढून ती गाडीत ठेवण्यात आली होती.
रविवारी दुपारी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी पोलीस ठाण्यात आले. या अधिकाऱ्यांनी कारची तपासणी केली असून त्याचा अहवाल लवकरच वरळी पोलिसांना देण्यात येणार आहे. या अपघातप्रकरणी मिहीरचे वडील राजेश शहा आणि चालक राजेंद्रसिंग बिडावतला या दोघांना वरळी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राजेश हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते आहेत.