मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन झालेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत घरांच्या किमतीने कोटींची उड्डाणे घेतली आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाची २०३० घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. या लॉटरीत ताडदेव येथील उच्च गटासाठीच्या घरांची किंमत सर्वाधिक म्हणजे सुमारे साडेसात कोटी आहे.
मुंबई मंडळाच्या लॉटरीचे नाव नोंदणी आणि अर्ज भरण्यास सुरुवात झाली. या लॉटरीच्या जाहिरातीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. या लॉटरीत ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमध्ये उच्च गटासाठी घरे आहेत. १४१ चौ.मी. क्षेत्रफळाची दोन घरे उपलब्ध असून एका घराची किंमत ७ कोटी ५२ लाख ६१ हजार ६३१ रुपये जाहिरातीमध्ये दर्शविण्यात आली आहे. तर १४२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या ३ घरांचा समावेश असून एका घराची किंमत ७ कोटी ५७ लाख ९४ हजार २६८ रुपये आहे.
तर जुहू विक्रांत सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये १०७ चौ.मी.ची घरे असून त्यांची किंमत ४ कोटी ८७ लाख ९७ हजार १९७ रुपये निश्चित केली आहे.
विक्रोळी, कुर्ला, बोरिवलीत घरे
विक्रोळी, कुर्ला, बोरिवली, अंधेरी, सांताक्रुझ, मुलुंड, चेंबूर, ओशिवरा, करिरोड, वडाळा, लोअर परळ, माझगाव, भायखळा, दादर, माहीम, घाटकोपर, मानखुर्द आणि कांदिवलीमध्ये विविध उत्पन्न गटासाठी घरे आहेत. या घरांच्या किमतीही २९ लाखांपासून ४ कोटींच्या घरात आहेत.
२०३० सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला प्रारंभ
म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी 'गो लाईव्ह' समारंभाद्वारे प्रारंभ करण्यात आला.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जयस्वाल यांनी नागरिकांना म्हाडाच्या सोडतीमध्ये संगणकीय प्रणालीतूनच अर्ज करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर म्हणाले की, सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी २७६ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.