

सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी वाढवलेली जवळीक कधी आणि कशी अंगाशी येऊ शकते, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार मुंबईतील मुलुंड परिसरात समोर आला आहे. Snapchat वर ओळख झाल्यानंतर एका तरुणाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ४० हजार रुपये उकळले. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे थेट पंजाबमध्ये जाऊन २२ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
'फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, सतनाम मनदीप सिंग (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या, विशेषतः तरुण मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मैत्री ते सेक्सटॉर्शन: नेमकं काय घडलं?
मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील असलेली २३ वर्षीय पीडित तरुणी मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोड परिसरात आपल्या नातेवाईकांकडे राहते आणि केअरगिव्हर (काळजीवाहू) म्हणून काम करते. १४ जुलै रोजी तिला स्नॅपचॅटवर 'Arush iwant' नावाच्या एका अकाउंटवरून ‘Hi’ असा मेसेज आला. तिने त्याला उत्तर दिल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि Video Call वरही बोलणे सुरू झाले.
२७ जुलै रोजी आरोपी सतनाम याने तिच्याकडून अडचणीचे कारण सांगून ४,००० रुपये घेतले. त्यानंतर एका व्हिडिओ कॉल दरम्यान त्याने तरुणीला विश्वासात घेऊन कपडे काढण्यास प्रवृत्त केले आणि त्या प्रसंगाचे गुपचूप मोबाईलमध्ये रेकॉर्डींग केले.
आयफोनची मागणी आणि ब्लॅकमेलिंग
व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर आरोपीने आपले खरे रूप दाखवले. त्याने तरुणीकडे ४० हजार रुपये आणि एक महागडा आयफोन मागितला. तरुणीने नकार देताच तो आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर आणि तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली. या भीतीपोटी तरुणीने त्याला ४० हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र, आयफोन दिला नाही. शेवटी तरुणीने त्याचा नंबर ब्लॉक केला.
धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्याच दिवशी आरोपीने तो व्हिडिओ तरुणीच्या आईच्या मोबाईलवर पाठवला. आईने फोन करून विचारणा केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि पीडितेने थेट मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
पंजाबमधून आरोपीला बेड्या
घटनेचे गांभीर्य ओळखून पूर्व प्रादेशिक विभागाचे पोलीस उपायुक्त अभयसिंग देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढला. मुलुंड पोलिसांचे एक पथक पंजाबला रवाना झाले आणि त्यांनी श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील कोट कपुरा रोड परिसरातून आरोपी सतनाम सिंग याला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनोळखी व्यक्तींशी Video Call करताना सावध राहा
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीकडून आलेली Friend Request, Message किंवा Video Call स्वीकारताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कोणी पैसे मागत असेल, तर घाबरून पैसे देऊ नयेत. अशा वेळी संबंधित पुरावे जतन करून तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी सांगितले.