

गेल्या तीन दिवसांपासून बेस्टच्या संपामुळे होणाऱ्या गैरसोयीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बसची वाट पाहत तासन्तास थांबणाऱ्या आणि पर्यायी वाहतुकीसाठी जादा खर्च करणाऱ्या लाखो मुंबईकरांना दिलासा देत बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सोमवारी (दि.२२) सकाळपासून बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होऊ लागली आहे.
बेस्ट बससेवा पुन्हा सुरू
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये बेस्टच्या बस पुन्हा रस्त्यावर धावताना दिसत आहेत. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बससेवा सुरू झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र सर्व मार्गांवरील सेवा अद्याप पूर्णपणे पूर्ववत झालेली नसून, काही मार्गांवर सकाळच्या सत्रात बससेवा सुरू होऊ शकली नसल्याची माहिती समोर आली आहे.
चर्चेनंतर मार्ग मोकळा
शुक्रवारपासून सुरू असलेल्या या संपामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य सरकार आणि संपकरी कर्मचारी संघटना यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य
चर्चेदरम्यान सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या. त्यानुसार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात ३ हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा २ हजार रुपयांची वेतनवाढ देण्यात येणार आहे.
याशिवाय चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून प्रलंबित ग्रॅच्युइटीची रक्कम देण्यास सरकारने सहमती दर्शवली आहे. कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचेही आश्वासन देण्यात आले.
सचिन अहिर यांची घोषणा
बैठकीनंतर कामगार संघटना आणि सरकार यांच्यातील समन्वयक तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सचिन अहिर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा करत कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आवाहन केले.
"सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून संप मागे घेण्यात आला आहे. मुंबईतील बससेवा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले. संघटनेच्या प्रतिनिधींनी उर्वरित मागण्यांवर पुढील १५ दिवसांत चर्चा सुरू राहणार असल्याचेही सांगितले.
तीन दिवस मुंबईकरांचे हाल
संपामुळे बेस्टची वाहतूक व्यवस्था जवळपास ठप्प झाली होती. त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह लाखो प्रवाशांचे मोठे हाल झाले. पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असल्याने रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके आणि टॅक्सी स्टँडवर मोठी गर्दी होत होती.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.