BMC Mayor : महायुतीकडून उमेदवार जाहीर; मुंबईच्या महापौरपदासाठी रितू तावडे तर उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा

महापौर आणि उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी, म्हणजेच आज संपणार आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने अंतिम मुदतीआधीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
BMC Mayor : महायुतीकडून उमेदवार जाहीर; मुंबईच्या महापौरपदासाठी रितू तावडे तर उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा
Published on

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी ११ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. महापौर आणि उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी, म्हणजेच आज संपणार आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने अंतिम मुदतीआधीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही महापौर आणि उपमहापौरपदाबाबत निर्णय प्रलंबित होता. अखेर शनिवारी (दि. ७) शिवसेना आणि भाजपची संयुक्त बैठक पार पडली असून या बैठकीत दोन्ही पदांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. या संयुक्त बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी भाजपच्या रितू तावडे यांची महापौरपदासाठी अधिकृत घोषणा केली. तर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली.

महापौरपदावरून मतभेद

मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना (शिंदे गट)-भाजप युतीने संयुक्तपणे लढवली होती आणि या युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. महापौरपदावरून काही काळ मतभेद पाहायला मिळाले असले तरी त्यावर तोडगा निघाला. त्यानुसार, महापौरपद भाजपला, तर उपमहापौरपद शिवसेनेला देण्यावर सहमती झाली. यानुसार, रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी, तर संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेत महिला आरक्षण

यंदा मुंबई महापालिकेत महिला आरक्षण लागू करण्यात आले असल्याने महापौरपदी महिला विराजमान होणार, हे निश्चित होते. भाजपाचे ८९ आणि शिंदे गटाचे २९ नगरसेवक निवडून आल्याने महायुतीचाच महापौर होणार, याचे संकेत आधीच मिळाले होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक निवडून आल्याने त्यांनीही महापौरपदावर दावा केला होता.

रितू तावडे यांच्या नावाला पसंती

महापौरपदासाठी ठाकरे गटाकडून माजी महापौर श्रद्धा जाधव आणि विशाखा राऊत यांची नावे चर्चेत होती. तर भाजपकडून राजश्री शिरवडकर, रितू तावडे आणि योगिता कोळी यांच्या नावांची चर्चा सुरू होती. अखेर चर्चेनंतर भाजपाच्या रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

येत्या बुधवारी, ११ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून अजून कोणताही अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एकमेव नगरसेवकाने महायुतीला पाठिंबा दिला आहे. याच अनुषंगाने, महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in