

मुंबई : ठळकपणे दिसतील अशा शब्दात मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांची झाडाझडती घ्या. मराठी पाटी नसेल तर ‘ऑन दी स्पॉट’ नोटीस बजावण्यात यावी, असे सक्त निर्देश विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी पालिका प्रशासनाला दिले. सेलिब्रिटींच्या आस्थापनांवर मराठी पाटी आहे की नाही याची तपासणी करा. मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर महिनाभरात कारवाई करा, अन्यथा अधिकाऱ्यांवरच कारवाई होईल, असा इशारा दीक्षा कारकर यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठी नामफलकाबाबत स्पष्ट आदेश दिले असतानाही मुंबईतील हजारो दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांवर आजही मराठी पाट्या नसल्याचा गंभीर मुद्दा विधी समिती सदस्य व नगरसेवक तजिंदर सिंग तिवाना यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे सोमवारी बैठकीत उपस्थित केला.
मराठी नामफलकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही प्रशासन नेमके काय करत आहे? कारवाई सक्तीची का केली जात नाही, असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला.
मुंबईतील हजारो दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर मराठी नाव नसतानाही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. “फक्त नोटीस देता का? की प्रत्यक्ष दंड करता? किती आस्थापनांवर दंड आकारला आणि किती परवाने निलंबित केले?” अशी विचारणा त्यांनी केली.
मुंबईमध्ये वेस्टिन, मॉर्गन स्टॅन्ले यांसारख्या मोठ्या हॉटेल्स आणि व्यावसायिक इमारतींवर केवळ इंग्रजीमध्ये नावे झळकतात. अशा मोठ्या आस्थापनांना वेगळे नियम आहेत का? असा सवाल तेजिंदर तिवाना यांनी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, मुंबईत ५,०२० आस्थापनांनी मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
इंग्रजी नाव मोठे तरी कारवाई
मुंबईतील अनेक आस्थापनांवर इंग्रजी भाषेतील फलक मोठ्या अक्षरात तर मराठी भाषेतील फलक छोट्या अक्षरात असेल तरी अशा आस्थापनावर कारवाई करण्यात यावी, असे सक्त निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याचे विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी सांगितले.