Mumbai : ४० वर्षांपासून एकट्याच राहत होत्या; वृद्धेच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार, मुलींना शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात

१३ नोव्हेंबर रोजी निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्कारांची व्यवस्था केली. त्यांच्या अखेरच्या प्रवासात जवळच्या कुटुंबातील कोणीच सदस्य उपस्थित नव्हते.
Mumbai : ४० वर्षांपासून एकट्याच राहत होत्या; वृद्धेच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार, मुलींना शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात
Mumbai : ४० वर्षांपासून एकट्याच राहत होत्या; वृद्धेच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार, मुलींना शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात(Photo-X)
Published on: 

मुंबई : आयुष्याची तब्बल ४० वर्षे एकट्याने घालवली, अखेरचा श्वास घेतानाही जवळच्या माणसांची साथ मिळाली नाही. मूळच्या चेन्नई येथील ललिता कृष्णमूर्ती यांच्या आयुष्याची ही कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. १३ नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. मात्र, त्या नेमक्या कुठे आहेत, याची माहिती कोणालाच नाही. अखेर आईच्या निधनानंतर तरी मुलींपर्यंत ही बातमी पोहोचावी, यासाठी नातेवाईकांनी वृत्तपत्रात जाहिरात देत त्यांचा शोध सुरू केला आहे.

चार दशकांपासून एकाकीपणा

ललिता कृष्णमूर्ती यांचे आयुष्य गेल्या चार दशकांपासून एकाकीपणात गेले. त्यांना दोन मुली असूनही त्यांच्याशी संपर्क होता की नाही, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मुली सध्या कुठे राहतात, त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा, याची माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनाही नव्हती.

कृष्णमूर्ती यांच्या संपर्कात त्यांचे चुलत नातेवाईक असलेले एक दाम्पत्य होते. शेजारीही वेळोवेळी त्यांना मदत करत होते. १३ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर याच नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्कारांची व्यवस्था केली. त्यांच्या अखेरच्या प्रवासात कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित नव्हते.

मुलींचा शोध घेण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात

कृष्णमूर्ती यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत त्यांचा फोटो देतानाच १३ नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच त्यांचे मूळ गाव चेन्नई असल्याचाही उल्लेख करण्यात आला.

या जाहिरातीद्वारे त्यांच्या दोन्ही मुलींना, इतर नातेवाईकांना आणि कुटुंबाची माहिती असलेल्या व्यक्तींना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरुवातीला निधनाची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध केलेली ही जाहिरात आता त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे माध्यम ठरली आहे.

सोशल मीडियावरून समोर आली वृद्धेची कहाणी

आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी होणारे किशोर सुब्रमण्यम यांनी १९ नोव्हेंबर रोजी 'एक्स' वर ही माहिती शेअर केली. त्यांनी कृष्णमूर्ती यांच्या नातेवाईकाने वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीचा फोटो पोस्ट केला होता.

जाहिरात वाचल्यानंतर आपण व्यथित झालो आणि त्यात दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले. हा फोन पवन शेट्टी यांना लागला. त्यांनी कृष्णमूर्ती यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळातील परिस्थितीबाबत माहिती दिली.

Mumbai : ४० वर्षांपासून एकट्याच राहत होत्या; वृद्धेच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार, मुलींना शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात
Pune : 'मला काही झाल्यास सासू जबाबदार'; मृत्यूपूर्वी पायल झांबरेचा मेसेज, हुंड्यासाठी छळ केल्याचा माहेरच्यांचा आरोप

सुब्रमण्यम यांच्या पोस्टनुसार, कृष्णमूर्ती यांच्या दोन मुली आहेत, मात्र त्यांचा सध्याचा पत्ता किंवा त्यांच्याशी संपर्क का तुटला, याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे मुलींचा शोध घेण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मदतीचे आवाहन केले आहे.

'पैसे पाठवणे म्हणजे काळजी घेणे नव्हे'

या घटनेच्या निमित्ताने सुब्रमण्यम यांनी वृद्ध आई-वडिलांच्या एकटेपणाचा मुद्दाही उपस्थित केला. केवळ आर्थिक मदत केल्याने त्यांची भावनिक गरज पूर्ण होत नाही, असे त्यांनी म्हटले. महिन्याला पैसे पाठवले तरी वृद्धांना रात्रीच्या एकटेपणात कोणाची तरी सोबत हवी असते. त्यांची विचारपूस करणारा, त्यांच्याशी बोलणारा आणि गरजेच्या वेळी जवळ असणारा माणूस महत्त्वाचा असतो, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

शेजाऱ्यांच्या मदतीचे कौतुक

कृष्णमूर्ती यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शेजाऱ्यांचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले. रक्ताचे नाते नसतानाही त्यांनी अखेरच्या क्षणी साथ दिली, अशा प्रतिक्रिया काही युजर्सने व्यक्त केल्या.

दरम्यान, कृष्णमूर्ती यांच्या दोन्ही मुली किंवा इतर नातेवाईकांबाबत कोणाकडे माहिती असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन सुब्रमण्यम यांनी केले आहे. वृद्ध आई-वडिलांपासून दूर राहणाऱ्या मुलांनी त्यांच्यासाठी वेळ काढावा आणि त्यांची विचारपूस करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

ललिता कृष्णमूर्ती यांचे निधन झाले असले, तरी त्यांच्या मुलींचा शोध अद्याप सुरू आहे. त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत ही माहिती पोहोचावी, यासाठी सुब्रमण्यम यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)