मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मुंबईत रात्रभर कोसळधार पावसाने हजेरी लावली असून सकाळपासूनही पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने आज (रविवार) मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे या 6६ जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मध्यरात्रीपासून आतापर्यंत मुंबईत तब्बल ६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी
Published on

मुंबईत रात्रभर कोसळधार पावसाने हजेरी लावली असून सकाळपासूनही पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने आज (रविवार) मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे या 6६ जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मध्यरात्रीपासून आतापर्यंत मुंबईत तब्बल ६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा वाढता जोर आणि हवामान खात्याचा इशारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ३ तासांत मुंबई आणि ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. विजांचा कडकडाट, गडगडाट आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील नाशिक व पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

वाहतुकीवर मोठा परिणाम

रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. भांडुपसह काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी जमा झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रविवारी रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी असली तरी लोकल सेवांवर पावसाचा फटका बसतोय.

  • मध्य रेल्वेने आज विद्याविहार ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉक घेतल्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

  • ट्रान्सहार्बर मार्ग व पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

  • मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे.

  • प्रशासनाने नागरिकांना 'महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका' असे आवाहन केले आहे.

राज्यातील इतर भागांतील स्थिती

  • मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाने जोर धरला आहे. अनेक धरणे पूर्ण भरल्याने विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे पुराचा धोका अधिक गडद होत आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे शिक्षण क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे.

  • आतापर्यंत ७८ शाळांतील १२५ वर्गखोल्या पूर्णपणे पडझडीत, तर १३० शाळांतील ३८७ वर्गखोल्यांचे नुकसान झाले आहे.

  • २५ शाळांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शालेय साहित्य आणि पोषण आहाराचे प्रचंड नुकसान झाले आहे.

  • शिक्षण विभागानुसार जिल्ह्यात तब्बल २ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

नागरिकांना सतर्कतेचा सल्ला

सक्रिय मान्सून व कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रभर मुसळधार पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुणे या भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे, घराबाहेर अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि हवामान खात्याच्या सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील काही तास मुंबईकरांसाठी धोक्याचे ठरू शकतात, त्यामुळे ‘रेड अलर्ट’चा गांभीर्याने विचार करून सुरक्षित राहणे अत्यावश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in