
राजधानी मुंबईत मुसळधार पावसाने कहर केला आहे. रस्ते जलमय होऊन वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारीही (दि. १९) शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान खात्याने उद्याही रेड अलर्ट जारी केला आहे.
पावसाचा जोर पाहता मुंबईतील सर्व शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी ठाण्यात हा निर्णय दिल्यानंतर मुंबईतील परिस्थितीचा अंदाज पाहून मुंबईतील शाळांबाबत निर्णय देण्यात येईल असे प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आले होते.
हवामान खात्याने उद्या मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ दिला आहे. तसेच, आवश्यकतेनुसार मदतीसाठी नागरिकांनी १९१६ या बीएमसी मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने देखील परिपत्रक काढून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात सतत पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उद्या सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी घोषित केली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.