

मुंबई : जोगेश्वरी पूर्व पेप्सी कंपाऊंड (गोडाऊन), पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ७३ मधील पालिका उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्तावास पालिकेच्या सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांची व शिवप्रेमींची ही अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे.
मातोश्री आर्ट्स अँड स्पोर्ट्स ट्रस्टची जबाबदारी
हा अश्वारूढ पुतळा तयार असून, पुतळ्याची देखभाल, मांगल्य आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी ‘मातोश्री आर्ट्स अँड स्पोर्ट्स ट्रस्ट’ यांनी घेणार आहे. पालिका सभागृहात या प्रस्तावास अंतिम मंजुरी मिळाल्याने पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून जोगेश्वरी व उत्तर-पश्चिम मतदारसंघातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.