

बदलापूर : मुंबई उपनगरीय लोकलमध्ये घडणाऱ्या हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे, सरचिटणीस जितेंद्र विशे आणि सल्लागार मनोहर शेलार यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली. मागील सहा महिन्यांत मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर हिंसाचाराच्या तीन गंभीर घटना घडल्या असून, हाणामारी व चाकूहल्ल्यांमध्ये लोकलमधील हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची सुनावणी जलदगती न्यायालयात करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली असल्याचे मनोहर शेलार यांनी स्पष्ट केले. या अमानुष घटनांमुळे सर्वसामान्य लोकल प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता व भीती पसरली आहे.