

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये जनरल डब्यात एका पुरुष प्रवाशाने महिलेला मारहाण केल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
संबंधित महिला जनरल डब्यातील एका सीटवर झोपली होती. याच कारणावरून तिचा एका पुरुष प्रवाशासोबत वाद झाला. हा वाद वाढत जाऊन संबंधित व्यक्तीने महिलेला थपडा मारण्यास सुरुवात केली आणि तिच्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपी प्रवासी कमरेचा बेल्ट काढताना आणि महिलेला मारण्याची धमकी देताना दिसत आहे. या प्रकारामुळे डब्यातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, या संपूर्ण घटनेत उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी हस्तक्षेप न केल्याने त्यांच्यावरही सोशल मीडियावर टीका होत आहे. महिलेला मदत करण्यासाठी किंवा आरोपीला रोखण्यासाठी अनेक पुरुष प्रवासी पुढे आले नाहीत, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे केवळ आरोपीवरच नव्हे तर बघ्याची भूमिका घेणाऱ्या प्रवाशांवरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आरोपीला गोवंडीतून अटक
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून ३६ वर्षीय मोहम्मद रिझवान अन्सारी याला गोवंडी येथून अटक केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७४, २९६ आणि ११५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
गेल्या काही काळात मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमधील वाद, हाणामाऱ्या आणि हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या नव्या घटनेमुळे लोकलमधील सुरक्षा व्यवस्था, पोलिसांची गस्त आणि प्रवाशांच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.