मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास; “मुंबईचा महापौर मराठी हिंदू...

"मुंबईचा आगामी महापौर मराठी हिंदू असेल, असा दावा 'आज तक'च्या 'मुंबई मंथन' या कार्यक्रमात गुरुवारी (दि.८) देवेंद्र फडवीस यांनी केला. ते म्हणाले ठाकरे बंधू ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास; “मुंबईचा महापौर मराठी हिंदू...
(Photo-X/@Devendra_Office)
Published on

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा महापौर कोण होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. असे असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौरबाबत भाष्य केले आहे. "मुंबईचा आगामी महापौर मराठी हिंदू असेल," असा दावा 'आज तक'च्या 'मुंबई मंथन' या कार्यक्रमात गुरुवारी (दि.८) देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कारसेवक आणि रामसेवक असल्याचा अभिमान

'मुंबई मंथन' या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील प्रोफाईलमध्ये कारसेवक, रामसेवक, महाराष्ट्रसेवक असा उल्लेख असल्याबाबत त्यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सांगितले, “मला कारसेवक आणि रामसेवक असल्याचा अभिमान आहे, म्हणून मी तसं ठेवलं आहे. राम मंदिर उभारत असताना मी ते माझ्या प्रोफाईलमध्ये नमूद केले होते आणि ते आजही तसेच आहे. मात्र ‘राष्ट्र प्रथम’ हीच विचारधारा असून त्यापासून आम्ही कधीही दूर गेलेलो नाही.” असे फडणवीसांनी सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप

दरम्यान, एआयएमआयएम (AIMIM) च्या एका नेत्याने मुंबईची महापौर हिजाब घालणारी महिला होईल, असे वक्तव्य केल्यानंतर महापौर कोण होणार, यावरून राजकीय वाद वाढला आहे. यासंदर्भात विचारण्यात आले असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, “हा विषय नेमका कुठून आला, हे पाहायला हवे. आमचे एक नेते मीरा-भाईंदरमध्ये गेले होते. तिथे त्यांनी भाषण करताना उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो असे सांगितले. त्यानंतर हा विषय मुंबईत आणून मोठा गदारोळ करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजप उत्तर भारतीय महापौर बसवणार असल्याचा आरोप केला.” असे फडणवीसांनी म्हटले.

तेव्हा विरोधकांचे खरे चेहरे समोर आले...

ते पुढे म्हणाले, “त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितले की, हे बघा, उत्तर भारतीय हे आमचेच बंधू आहेत. ते या देशाचेच नागरिक आहेत, बाहेरून आलेले नाहीत. मात्र, मुंबईला महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे, त्यामुळे मुंबईचा महापौर मराठीच होणार आहे. पण मला तेव्हा आश्चर्य वाटले, जेव्हा एआयएमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी ‘मुंबईची महापौर हिजाब घालणारी महिला होईल’ असे म्हटले आणि त्यावर कोणीही आवाज उठवला नाही. तेव्हा जे लोक आमच्यावर तुटून पडले होते, ते पूर्णपणे शांत होते. त्यावेळी त्यांचे (विरोधकांचे) खरे चेहरे समोर आले. त्यांच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश झाला." असे फडणवीस म्हणाले.

महापौरांचे पद मराठी हिंदूंसाठी राखीव?

"मी ठामपणे सांगतो की, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असून तो हिंदू आणि मराठी असणार आहे,” असे स्पष्ट विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यानंतर महापौरांचे पद मराठी हिंदूंसाठी राखीव आहे का, असे विचारले असता, फडणवीस यांनी थेट होकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले, “हो, बिलकुल. १०० टक्के."

ठाकरे बंधू एकत्र आले तरीही...

मराठीच महापौर होणार यावर ठाम विश्वास कसा असू शकतो, याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, २०१४ आणि २०२४ मध्ये त्यांनी आमच्याविरोधात लढून पाहिले की, आमची एकही जागा मुंबईत कमी झाली नाही. मुंबईत आम्हीच अग्रेसर आहोत. मुंबईच्या जनतेने आम्हाला मतदान केले नसते तर आम्ही जिंकू शकलो असतो का? आमचा मतदार मराठी आहे. अमराठीही आहे. सर्व समाज आमच्यासाठी मतदान करतात. महाराष्ट्रात भाजप आणि नरेंद्र मोदींना मानणारा मोठा समूह आहे. त्यामुळे दोन्ही भाऊ (ठाकरे बंधू) एकत्र आले तरीही आमची मतं कमी होणार नाहीत," असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

महायुतीच्या तिन्ही पक्षांनी ठरवलं की...

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक या कार्यकर्त्यांच्या असतात आणि महाराष्ट्रात ही निवडणूक १० वर्षांनी होत आहे. २०२२ मध्ये निवडणूक होणार होती. सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली होती. आता ही निवडणूक २०२६ मध्ये होत आहे. प्रत्येक निवडणुकीत एक पिढी तयार होत असते. २०१७ त्यानंतर २०२२ त्यांना निवडणुका लढवता आल्या नाहीत. त्यामुळे, आता सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायची आहे. म्हणून महायुतीच्या तिन्ही पक्षांनी ठरवलं की, आपल्याला जिथे युती करता येईल तिथे करायची. पण काही ठिकाणं अशी आहेत, जसं की, पुण्यातील पिंपरी-चिंचवड. जिथे भाजप प्रथम स्थानावर आहे तर अजित पवार यांची एनसीपी दुसऱ्या स्थानावर. तिसऱ्या कोणत्या पक्षाचा जास्त संबंध येत नाही. तिथे जर आम्ही युती केली तर त्याचे दोन नुकसान आहेत. एकतर, कार्यकर्त्यांना लढायला मिळणार नाही म्हणून ते चिडतील आणि दुसरं म्हणजे, जे नाराज लोकं आहेत त्यांना उरलेले पक्ष म्हणजे ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्ष आमच्या विरोधात उभे करतील. म्हणून आम्ही अशी स्ट्रॅटेजी ठेवली की, अशा ठिकाणी आम्ही युती करायला नको." असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास; “मुंबईचा महापौर मराठी हिंदू...
‘त्यांचा’ जीव मुंबईत अडकलाय! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; विरोधकांवर टीकेची झोड

मुंबईतील वाहतूक व्यवस्था दिल्लीच्या तुलनेत चांगली

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर बोलताना फडणवीस म्हणाले, "मुंबईतील वाहतूक व्यवस्था ही दिल्लीच्या तुलनेत खूपच चांगली आहे. मुंबईतील नागरिक शिस्तप्रिय असून संयमाने वाहतूक नियमांचे पालन करतात, असे त्यांनी कार्यक्रमात सांगितले. पुढे ते म्हणाले, “मुंबईत कोणीही लेन तोडत नाही. लोक शांतपणे आपली वेळ येईपर्यंत थांबतात. दिल्लीमध्ये रस्त्यांवर एका बाजूला गाड्या धडकलेल्या दिसतात. मुंबईत असे दृश्य कुठेही पाहायला मिळत नाही.”

एकाच तिकिटावर कोणतेही सार्वजनिक वाहन वापरता येणार

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, "उपनगरीय रेल्वेपासून मेट्रोपर्यंत संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. एका सिंगल ॲपवर नागरिक आपला संपूर्ण प्रवासाचा प्लॅन करू शकतील. एकाच तिकिटावर कोणतेही सार्वजनिक वाहन वापरता येईल, अशी प्रणाली आम्ही तयार केली आहे,” असे त्यांनी सांगितले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात

मुंबई स्लममुक्त करण्याच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून १० लाख लोकांचे पुनर्वसन केले जात आहे. हे शक्य आहे, असा विश्वास आता नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. नव्या डेव्हलपर्सना संधी दिली आहे. त्यामुळे पुढील सात ते आठ वर्षांत मुंबई स्लममुक्त करण्याचा आत्मविश्वास मला वाटतो,” असे ते म्हणाले.

कामे झाल्यावर जलभरावाचा प्रश्न सुटेल

पावसाळ्यातील जलभरावामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत फडणवीस म्हणाले की, "यंदा वाहतूक ठप्प झाल्याच्या तक्रारी तुलनेने कमी होत्या. मुंबई हे तटीय शहर आहे. पावसाचे पाणी समुद्रातच जाते. मात्र, हाय टाइडमुळे पाणी परत येते. यावर उपाय म्हणून अनेक पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर जलभरावाचा प्रश्न सुटेल,” असे त्यांनी सांगितले.

मुंबईबाहेरील भागात एमएमआरडीएकडे जबाबदारी

मुंबई वेगळी करण्याचे किंवा बीएमसी संपवण्याचे आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "एमएमआरडीएची स्थापना ३०-४० वर्षांपूर्वी झाली होती. पूर्वी एमएमआरडीए फारसे काम करत नव्हते. मात्र, मागील वर्षभरात त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. मुंबईत बीएमसीच काम करते, तर मुंबईबाहेरील भागात एमएमआरडीएकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पासाठी उद्धव ठाकरे यांनी योगदान देण्यास नकार दिल्यानंतर एमएमआरडीएकडून निधी देण्यात आला. तरीही एमएमआरडीएने बीएमसीच्या अधिकारक्षेत्रात कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. आम्ही केवळ पायाभूत सुविधा उभारण्याचे काम केले आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in