Mumbai : रुळावर अडकलेल्या भटक्या कुत्र्यासाठी मोटरमनने थांबवली लोकल; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकावर रुळांवर अडकलेल्या भटक्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी मोटरमनने लोकलचा वेग कमी करत प्रसंगावधान दाखवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोटरमनच्या कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
Mumbai : रुळावर अडकलेल्या भटक्या कुत्र्यासाठी मोटरमनने थांबवली लोकल; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक
Published on

मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल गाड्या संथ गतीने धावत असतानाच कुर्ला रेल्वे स्थानकावरील एक हृदयस्पर्शी प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वे रुळांवर अडकलेल्या भटक्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी एका मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकलचा वेग कमी केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मोटरमन आणि कुत्र्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या नागरिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रुळांवर अडकला भटका कुत्रा

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कुर्ला रेल्वे स्थानकाच्या रुळांवर एक भटका कुत्रा उभा असल्याचे दिसते. त्याचवेळी स्थानकात मुंबई लोकल येत असते. मोटरमनने कुत्र्याला बाजूला करण्यासाठी वारंवार हॉर्न वाजवला, मात्र तो रुळांवरून हलला नाही.

यानंतर एका व्यक्तीने धाडस दाखवत रुळांवर उतरून कुत्र्याला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या कुत्र्याने तातडीने प्रतिसाद दिला नाही. व्हायरल व्हिडीओ याच ठिकाणी संपत असल्याने पुढे नेमके काय झाले, याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली.

व्हायरल व्हिडीओ पाहा

प्रवाशांनी सांगितले पुढे काय घडले

घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा करणाऱ्या काही प्रवाशांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत कुत्र्याचा सुरक्षित बचाव झाल्याची माहिती दिली. एका प्रवाशाने सांगितले की, मोटरमनने कुत्र्याला सुरक्षित मार्ग मिळेपर्यंत लोकल अतिशय संथ गतीने पुढे नेली. अखेर कुत्रा सुखरूप बाहेर पडला.

Instagram

दुसऱ्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने दावा केला की, लोकल पूर्णपणे थांबवून एका नागरिकाने कुत्र्याला रुळांवरून सुरक्षित बाजूला नेले. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.

दरम्यान, आणखी एका नेटकऱ्याने कुत्रा अंध, बहिरा किंवा दोन्ही असण्याची शक्यता व्यक्त केली. त्याच्या मते, वारंवार हॉर्न वाजूनही कुत्र्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Instagram

या घटनेबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनुसार मोटरमनच्या सतर्कतेमुळे आणि एका नागरिकाच्या धाडसामुळे भटक्या कुत्र्याचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in