

मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित एआयनिर्मित बनावट व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तृतीयपंथी व्यक्तीच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. या तृतीयपंथी व्यक्तीच्या भावानेच हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. आरोपीने या व्हिडीओच्या बदल्यात पैशांची किंवा मंत्र्यांच्या विभागात नोकरीची मागणी केली होती.
गेल्या आठवड्यात झिरवाळ यांचा एक ‘आक्षेपार्ह’ व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या कथित व्हिडीओमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ त्यांच्या शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दाखवले होते.
संबंधित तृतीयपंथीने दोन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, काही महिन्यांपूर्वी तिचे काही व्हिडीओ रेकॉर्ड केले होते आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) सहाय्याने त्यात फेरफार केला होता.
संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, संबंधित तृतीयपंथी व्यक्तीने कफ परेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.