पालघर : पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर तिच्या ५० वर्षीय काकाने लैंगिक अत्याचार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी तक्रार करुनही एफआयआर नोंदवण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसल्याने पीडित मुलीच्या आई-वडिलांनी 'मुंबई प्रेस क्लब'मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे (DGP) तक्रार केली आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी रात्री सुमारे १०.२० वाजता हा प्रकार घडला. आरोपी मुलीचा काका आहे. तो सराफाचा व्यवसाय करत असून पीडितेच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहतो. तळमजल्यावर कौटुंबिक वाद सुरू असताना त्याने मुलीवर अत्याचार केल्याचं कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटलं आहे.
घटनेनंतर मुलीच्या वागण्यात मोठा बदल झाला. ती शाळेत जाण्यास टाळाटाळ करू लागली. घरात एकटी राहू लागली. तिला वारंवार ताप येत होता आणि भूकही कमी झाली होती. या सगळ्याचा परिणाम तिच्या अभ्यासावरही झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
आईने विश्वासात घेऊन विचारणा करताच रडू कोसळलं
मुलीच्या वागण्यातला बदल पाहून तिच्या आई्ने ४ ऑगस्टला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीला रडू कोसळलं आणि तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.
याबाबत समजताच संतप्त कुटुंबीयांनी थेट पालघर पोलिस ठाण्यात धाव घेतली. आरोपीविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र अधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवण्यात नकार दिला आणि ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करून ऑनलाइन तक्रार नोंदवण्यास भाग पाडल्याचा आरोपही नातलगांनी केला आहे.
चौकशीत पोलिसांकडूनही त्रास?
४ ऑगस्ट रोजीच मुलीला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर डॉक्टरांनी पोलिसांना देण्यासाठी वैद्यकीय मेमो दिला. ५ ऑगस्टला हा मेमो घेऊन कुटुंबीय पुन्हा पालघर पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी चौकशी दरम्यान पोलिसांनी मुलीला नाहक अनेक प्रश्नांची विचारणा केली, शिवाय या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यास मुलीच्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही मुलीच्या आईने केला.
पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने कुटुंबीयांनी अखेर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली. आरोपीविरोधात एफआयआर दाखल करावा, प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि निष्पक्ष तपासासाठी पालघर पोलिस ठाण्याबाहेर हे प्रकरण सोपवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पालघर SP म्हणाले, 'सखोल चौकशी करू'
या प्रकरणावर पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सखोल चौकशी केली जाईल, असं सांगितलं आहे. तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागलं आहे.