

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणात न्यायालयाने आज, बुधवारी (दि. २१) रेहान अन्सारी, फूलसिंग आणि ऋतिक महतो ऊर्फ रोशन या तिघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली आणि हरियाणातून आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
या प्रकरणातील तिन्ही आरोपींना ३७ व्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. गोळीबारासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाहीत. तसेच, आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेले मोबाईल फोन नष्ट केल्याचा दावा पोलिसांनी केला.
गुन्ह्यामागील कटाचा उलगडा करण्यासाठी तपास
गोळीबाराच्या संपूर्ण कटाचा उलगडा अद्याप झालेला नसून, या गुन्ह्याशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि मोबाईल फोनची विल्हेवाट कशी लावण्यात आली, याचा तपास करणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले. गुन्ह्याचे गांभीर्य आणि त्यामागील व्यापक कट लक्षात घेता, त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आरोपींची अधिक चौकशी गरजेची असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
दरम्यान, रेहान अन्सारीची बाजू मांडणारे वकील अजिंक्य मिरगळ यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यास विरोध केला. पोलिसांनी यापूर्वीच कोटा येथून ट्रान्झिट रिमांडवर आरोपींना ताब्यात घेतले असून, या प्रकरणात इतर आरोपींनाही अटक करण्यात आली आहे, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आरोपींना आणखी पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तिघांना दंडाधिकारी कोठडीत पाठवण्याची विनंती केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दुसऱ्या प्रसिद्ध कलाकारालाही लक्ष्य करण्याचा संशय
मुंबई गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, या गोळीबार प्रकरणातील तीन संशयित हल्लेखोर सुरुवातीला बॉलिवूडमधील आणखी एका प्रसिद्ध कलाकाराला लक्ष्य करण्याच्या तयारीत होते. मात्र, त्या कलाकाराभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी टायगर श्रॉफला लक्ष्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित कलाकाराची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही.
रविवारी (दि. १८) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास जुहू परिसरात हा गोळीबार झाला. त्यावेळी टायगर श्रॉफ एका फुटबॉल क्लबमधून बाहेर पडत होता. या घटनेत टायगर श्रॉफला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्याचा चालक जखमी झाला. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे.