वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात झुरळ; सोशल मीडियावर Video व्हायरल, IRCTCकडून केटरिंग कंत्राटदाराला १० लाखांचा दंड

वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणात झुरळ आढळल्याचा दावा एका व्हिडिओतून समोर आला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत प्रवाशाला ॲलर्जी झाल्याची तक्रारही समोर आल्याने अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात झुरळ; सोशल मीडियावर Video व्हायरल, IRCTCकडून केटरिंग कंत्राटदाराला १० लाखांचा दंड
वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात झुरळ; सोशल मीडियावर Video व्हायरल, IRCTCकडून केटरिंग कंत्राटदाराला १० लाखांचा दंड
Published on

भारतीय रेल्वेच्या हायस्पीड प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'च्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अहमदाबाद-मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसमधील जेवणात झुरळ आढळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

माहितीनुसार, गाडी क्रमांक २२९६२ अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना दुपारचे जेवण देण्यात आले होते. यावेळी आदित्य डिडवानिया नावाच्या प्रवाशाने एक्सवर पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केला. त्यांच्या कोचमधील किमान दोन प्रवाशांच्या जेवणात मेलेले झुरळ आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

हा प्रकार समोर येताच डब्यातील इतर प्रवाशांनी जेवण घेणे थांबवले आणि एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी संबंधित अन्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत रेल्वे मंत्रालयालाही टॅग केले.

आयआरसीटीसी (IRCTC) ची कारवाई

या घटनेची गंभीर दखल घेत आयआरसीटीसीने संबंधित केटरिंग कंत्राटदाराला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, त्याचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेवर प्रश्न

या प्रकारामुळे वंदे भारतसारख्या प्रीमियम गाड्यांमधील अन्न सुरक्षा उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा अपेक्षित असताना अशा घटना कशा घडतात, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अन्न तयार करताना व साठवताना कोणते निकष पाळले जातात, तसेच जेवण देण्यापूर्वी योग्य तपासणी केली जाते का, याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.

ॲलर्जीचा आरोप, प्रवाशाची तब्येत बिघडली

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने जेवणामुळे ॲलर्जी झाल्याचा आरोप केला होता.

एक्स हँडलवरून शेअर केलेल्या पोस्टनुसार, एक महिला २७ मार्च रोजी वाराणसी ते देवघर (गाडी क्रमांक २२५००) प्रवास करत होती. ट्रेनमधील जेवण जेवल्यानंतर तिचे ओठ सुजले. त्याचे फोटो आणि डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शनही तिने शेअर केले. वेळेत उपचार मिळाला नसता तर परिस्थिती गंभीर होऊ शकली असती, असेही तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले.

मुलालाही त्रास, पाण्याबाबतही शंका

तिच्या दोन वर्षांच्या मुलाची प्रवासादरम्यान त्याला जुलाबाचा त्रास झाल्याचा दावा करण्यात आला आहे. महिलेने ट्रेनमधील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही शंका व्यक्त केली आहे.

तपासाची मागणी

या दोन्ही घटनांमुळे वंदे भारत एक्सप्रेसमधील अन्न व पाणी पुरवठ्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने याची दखल घेऊन सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in