सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच आंदोलनाला नवे वळण; अभिजीत दिपकेंचं बेमुदत उपोषण सुरू

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच  आंदोलनाला नवे वळण; अभिजीत दिपकेंचं बेमुदत उपोषण सुरू
Published on: 

नवी दिल्ली : जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळावरून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या २१ व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी (दि. १८) बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली असून, २० जुलैचा 'चलो संसद' मोर्चा कोणत्याही परिस्थितीत नियोजनाप्रमाणेच काढला जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच निर्णय

जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात हलवले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिपके यांचे बेमुदत उपोषण

या कारवाईनंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरून बेमुदत उपोषण सुरू करत असल्याची घोषणा केली. तसेच, "२० जुलैचा 'चलो संसद' मोर्चा नियोजनाप्रमाणेच होणार आहे," असे CJP नेही स्पष्ट केले.

पोलिसांवर गंभीर आरोप

दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून जबरदस्तीने हटविण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

NEET आंदोलनाला वांगचुक यांचा पाठिंबा

नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांविरोधात CJP च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक २८ जूनपासून बेमुदत उपोषणावर होते. गेल्या २० दिवसांत त्यांचे सुमारे ९.५ किलो वजन घटल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच  आंदोलनाला नवे वळण; अभिजीत दिपकेंचं बेमुदत उपोषण सुरू
"२० जुलैपर्यंत जिवंत राहीन, नाहीतर भूत बनून परत येईन"; सोनम वांगचुक उपोषणावर ठाम

रुग्णालयाचे स्पष्टीकरण

सफदरजंग रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, दीर्घकाळ उपोषण आणि निर्जलीकरणामुळे वांगचुक अशक्त झाले असले तरी त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

सुरक्षा व्यवस्था वाढवली

घटनेनंतर जंतर-मंतर, सफदरजंग रुग्णालय आणि परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)