'कॅबला उशीरा झाला, म्हणून...'; गोव्याच्या नाइट क्लबमधील अग्निकांडातून थोडक्यात बचावलेल्या युवकाने सांगितली आपबिती

उत्तर गोव्यातील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. ५ आरोपी अटकेत असून एक कॅब चालक थोडक्यात वाचला आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.
'कॅबला उशीरा झाला, म्हणून...'; गोव्याच्या नाइट क्लबमधील अग्निकांडातून थोडक्यात बचावलेल्या युवकाने सांगितली आपबिती
'कॅबला उशीरा झाला, म्हणून...'; गोव्याच्या नाइट क्लबमधील अग्निकांडातून थोडक्यात बचावलेल्या युवकाने सांगितली आपबिती
Published on

शनिवारी (दि.६) मध्यरात्री उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लब (Birch by Romeo Lane) नाईट क्लबमध्ये भीषण आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत ६ जण गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि.८) गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून आठवडाभरात त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. या घटनेतील ५ आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अशातच, या दुर्घटनेत एक कॅब चालक थोडक्यात वाचला. माध्यमांशी बोलताना त्याने आपबिती सांगितली.

दिल्लीतील डॉ. अवनीश हे या दुर्दैवी घटनेच्या रात्री क्लबला जाण्याचा प्लॅन करत होते. त्यांनी सांगितले, “खरं तर आम्ही थोडक्यात वाचलो. आमचा कॅब ड्रायव्हर उशिरा आला, नाहीतर आम्हीही तिथेच असतो.”

“माझे दोन पुतणे गेले...

मृतांपैकी दोन जणांचे नातेवाईक असलेलले नारायण माथुर म्हणाले, “ही दोन्ही माझ्या मोठ्या भावाची मुलं होती. ते दोघेही रेस्टॉरंटच्या किचनमध्ये काम करत होते. आज सकाळी या दुर्घटनेची माहिती मिळाली. आमचा एक शेजारीही या आगीत मरण पावला. आम्ही सगळे झारखंडचे रहिवासी आहोत.”

२५ जणांचा मृत्यू; ७ जणांची ओळख अनुत्तरित

या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात ४ पर्यटक आणि १४ कर्मचारी यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. उर्वरित ७ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींवर जवळच्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, “पोलिस आणि अग्निशमन विभाग तपास करत आहेत आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू आहे.”

अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्राथमिक माहितीनुसार सांगितले, "नाईट क्लबने अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले होते. अर्पोरा गावातील हा क्लब मागच्या वर्षी सुरू झाला असून तो या परिसरातील लोकप्रिय पार्टी स्थळ बनला होता."

कठोर कारवाई होणार!

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, “क्लब व्यवस्थापनाविरुद्धच नव्हे, तर नियमांचे उल्लंघन करूनही परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल.”

ते पुढे म्हणाले, “पर्यटनाच्या सीझनमध्ये अशी भीषण घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. याबाबत सविस्तर चौकशी केली जाईल आणि दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल.”

logo
marathi.freepressjournal.in