बांगलादेशातील हिंसाचारावर भारत आक्रमक; परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईची मागणी, "अल्पसंख्याकांच्या विरोधातील शत्रुत्व...

बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील वाढत्या हिंसाचारावर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हिंदू युवकांच्या हत्येचा निषेध करत परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.
बांगलादेशातील हिंदू युवकाच्या हत्येवर भारताचा निषेध
बांगलादेशातील हिंदू युवकाच्या हत्येवर भारताचा निषेध
Published on

बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) या हिंसाचाराला 'अखंड आणि सातत्यपूर्ण शत्रुत्व' असे संबोधले. एका हिंदू युवकाच्या हत्येचा शुक्रवारी (दि.२६) तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, "शेजारील देशात अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य करून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारत सरकार अत्यंत अस्वस्थ आहे.
“बांगलादेशातील अल्पसंख्याकांविरोधातील हे सातत्यपूर्ण शत्रुत्व गंभीर चिंतेचा विषय आहे. हिंदू युवकाच्या हत्येचा आम्ही निषेध करतो आणि या गुन्ह्यातील दोषींना न्यायालयासमोर आणले जाईल, अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

परराष्ट्र मंत्रालयाची ही प्रतिक्रिया बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अमृत मंडल या हिंदू युवकाच्या जमावाकडून झालेल्या हत्येनंतर आली आहे. कथित खंडणीच्या आरोपावरून ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही काही दिवसांतील दुसरी अशी घटना आहे. याआधी १८ डिसेंबर रोजी दीपू चंद्र दास या तरुण हिंदू युवकालाही जमावाने निर्घृणपणे ठार मारले होते.

दरम्यान, बांगलादेशात पसरवली जात असलेली 'भारतविरोधी खोटी कथा' फेटाळून लावत जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, "कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही बांगलादेशातील अंतरिम सरकारची आहे. भारत या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांविरोधातील वाढत्या शत्रुत्वाबाबत चिंतित आहे."

“अंतरिम सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत २,९०० हून अधिक अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटना माध्यमांची अतिशयोक्ती म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत किंवा केवळ राजकीय हिंसाचार म्हणून फेटाळून लावता येणार नाहीत,” असेही जयस्वाल यांनी ठामपणे सांगितले.

बांगलादेशातील हिंदू युवकाच्या हत्येवर भारताचा निषेध
Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?

दरम्यान, आगामी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तारिक रहमान (BNP) तब्बल १७ वर्षांनंतर बांगलादेशात परतण्याच्या शक्यतेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल म्हणाले की, भारत बांगलादेशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचा समर्थक आहे, आणि कोणतीही राजकीय घडामोड याच दृष्टिकोनातून पाहिली गेली पाहिजे.

परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारत सरकार बांगलादेशातील घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

logo
marathi.freepressjournal.in