पती-पत्नीमधील वादातून अनेकदा विचित्र घटना समोर येतात, पण बिहारच्या सारण जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. माहेरी गेलेल्या पत्नीने पतीसोबत सासरी जाण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून संतापलेल्या जावयाने चक्क आपल्या अल्पवयीन मेहुणीलाच फूस लावून पळवून नेले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत जावयाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे नेमका प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, सारण जिल्ह्यातील सोनपूर दियारा परिसरातील एका कुटुंबाने वर्षभरापूर्वी आपल्या मोठ्या मुलीचे सारण जिल्ह्यातील एका युवकासोबत मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले होते. लग्नानंतर संबंधित महिला काही दिवसांसाठी माहेरी आली होती. दरम्यान १९ जून रोजी जावई तिला परत सासरी घेऊन जाण्यासाठी सासरी आला होता. मात्र, काही कौटुंबिक कारणांमुळे किंवा वादामुळे त्यावेळी कुटुंबीयांनी लेकीला पाठवण्यास नकार दिला.
संधी साधत मेहुणीलाच घेऊन फरार
कुटुंबीयांच्या आरोपानुसार, पत्नीला सोबत घेऊन जाता न आल्याने जावई नाराज झाला होता. त्यानंतर त्याने घरातील अल्पवयीन मुलीला लक्ष्य केले. २२ जून रोजी संधी साधून त्याने आपल्या अल्पवयीन मेहुणीला फूस लावून तिला पळवून नेल्याचा आरोप आहे.
मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर आणि जावईही संपर्कात नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार लक्षात आला. सुरुवातीला नातेवाईक आणि ओळखीच्या ठिकाणी दोघांचा शोध घेण्यात आला. मात्र, काहीच माहिती न मिळाल्याने अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पीडित कुटुंबाने सोनपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संबंधित जावयाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करून आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून, दोघांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास आणि शोधमोहीम सुरू केली आहे.