

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे ११ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. औषध सुरक्षेसंबंधी तातडीने कारवाई करत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या सूचनांमध्ये कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांचा वापर नियंत्रित करण्यास सांगण्यात आले आहे.
या घटनांनंतर चेन्नईस्थित एका औषध कंपनीद्वारे उत्पादित ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या विक्रीवर तमिळनाडूसह अनेक राज्यांनी बंदी घातली आहे. संबंधित सिरपचे नमुने केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, प्राथमिक तपासणीत डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल हे घातक रसायन आढळले नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तरीही, संभाव्य धोका टाळण्यासाठी सरकारने ‘प्रिकॉशनरी बॅन’ म्हणून तात्पुरती बंदी लागू केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे नवे मार्गदर्शक तत्त्वे
आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसने (DGHS) सर्व राज्यांना सल्ला जारी करत म्हटले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कोणतेही कफ किंवा सर्दीवरील औषध देऊ नये. पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. लहान मुलांमधील कफ-सर्दीचे आजार बहुतांश वेळा स्वतःहून बरे होतात, त्यामुळे औषधांचा वापर केवळ अत्यावश्यक असल्यासच करावा. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचा डोस आणि उपचारकालावधी काटेकोरपणे पाळावा. अनेक औषधे एकत्र देणे टाळावे.
नैसर्गिक उपायांना प्राधान्य
केंद्रीय सल्लागारात म्हटले आहे की, प्राथमिक उपचार म्हणून नैसर्गिक आणि घरगुती उपायांचा अवलंब करावा. पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे, वाफ घेणे, उबदार द्रव पदार्थांचे सेवन यांसारखे उपाय खोकला-सर्दी कमी करण्यास मदत करतात. औषधोपचार केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावेत.
औषध निर्मितीतील दर्जा महत्त्वाचा
आरोग्य मंत्रालयाने सर्व आरोग्य केंद्रे, रुग्णालये आणि दवाखान्यांना GMP (Good Manufacturing Practices) नुसार तयार केलेली आणि उच्च औषधी दर्जाची सिरपच खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. औषधांच्या उत्पादन, वितरण आणि तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
काय आहे पार्श्वभूमी?
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अलीकडेच ११ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर औषध सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. प्राथमिक तपासणीत मुलांना दिल्या गेलेल्या सिरपमुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. जरी नंतर नमुन्यांत घातक रसायने आढळली नाहीत, तरी सरकारने बालआरोग्याच्या जोखमीचा विचार करून देशव्यापी पुनरावलोकन सुरू केले आहे.
पालकांसाठी सूचना
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मुलांना खोकला-सर्दी झाल्यास स्वतःहून औषध देणे टाळावे. बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत. घरगुती उपायांवर भर देणे आणि मुलांच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे हे अधिक सुरक्षित पर्याय आहेत.