

नवी दिल्ली : प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. १० ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या घरातून जबरदस्तीने घेऊन जाताना मारहाण करण्यात आली आणि जवळपास २३ तास फोन किंवा वकिलाशी संपर्क साधू दिला नाही, असा दावा राठीने केला आहे. 'ही अटक किंवा ताब्यात घेण्याची कारवाई नव्हती, तर माझ्या मते हे अपहरण होते,' असे त्याने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याला ताब्यात घेण्यात आले होते.
'मला चप्पलही घालू दिली नाही'
ध्रुव राठीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजता पोलिस कर्मचारी आणि साध्या कपड्यांतील काही व्यक्ती त्याच्या घरात दाखल झाल्या. त्यावेळी तो झोपलेला होता. त्याच्या आईने दरवाजा उघडल्यानंतर त्यांना बाजूला ढकलून संबंधित व्यक्ती घरात आल्याचा आरोप राठीने केला. त्यानंतर या व्यक्तींनी घरात वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत त्याच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. काय घडत आहे हे समजण्यापूर्वीच आपल्याला बेडरूममधून फरफटत बाहेर नेण्यात आले आणि पायात चप्पल घालण्याची संधीही दिली नाही, असे राठीने म्हटले आहे.
'शरीरावर जखमा झाल्या'
राठीच्या दाव्यानुसार, त्याला घरातून बाहेर नेताना मारहाण करण्यात आली आणि शरीराच्या विविध भागांवर जखमा झाल्या. त्याच्या घराबाहेर ५० हून अधिक कर्मचारी तैनात होते, अशी माहितीही त्याने दिली. मात्र, घराबाहेर इतका मोठा बंदोबस्त असल्याचे आपल्याला नंतर समजल्याचे त्याने सांगितले. या संपूर्ण कारवाईदरम्यान त्याच्यासोबत आई-वडीलही घरी होते.
फोन जप्त केल्याचा आरोप
घरातून बाहेर नेल्यानंतर पोलिसांनी त्याला वाहनातून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेल्याचा दावा राठीने केला आहे. या कारवाईदरम्यान त्याचा आणि त्याच्या आई-वडिलांचा फोन तातडीने जप्त करण्यात आला. त्यामुळे घडलेल्या प्रकाराचे रेकॉर्डिंग करता आले नाही, असे त्याने सांगितले. जवळपास २२ ते २३ तास आपल्याला फोन वापरू दिला नाही किंवा वकिलाशी बोलण्याची परवानगी दिली नाही, असा आरोपही त्याने केला.
'ही अटक नव्हे, तर अपहरण'
राठीने आपल्या व्हिडीओमध्ये ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेणे आणि कोणतीही स्पष्ट माहिती न देता घरातून जबरदस्तीने घेऊन जाणे, या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे त्याने म्हटले. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने गणवेशात येऊन स्वतःची ओळख सांगितली असती, कायदेशीर तरतुदी स्पष्ट केल्या असत्या आणि पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले असते, तर आपण स्वतःहून गेलो असतो, असे राठीने सांगितले. मात्र, प्रत्यक्षात असे काहीही घडले नसल्याचा त्याचा दावा आहे.
नागरिकत्वाबाबतच्या चर्चांनाही उत्तर
ध्रुव राठीने आपल्या नागरिकत्वाबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यांनाही उत्तर दिले. आपल्याकडे भारतीय पासपोर्ट असून, इतर भारतीय नागरिकांप्रमाणेच आपल्यालाही समान अधिकार आहेत, असे त्याने म्हटले. काही माध्यमांकडून आपल्या नागरिकत्वाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्याने केला. तसेच, भविष्यात कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही, असे हमीपत्र आपण दिल्याची माहितीही खोटी असल्याचा दावा राठीने केला.
केंद्र सरकारवर 'अघोषित आणीबाणी'चा आरोप
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईवरून राठीने केंद्र सरकारवर टीका केली. आपल्या मते, देशात लोकशाही अधिकारांवर गदा आणली जात असून, सरकारकडून 'अघोषित आणीबाणी'सारखी परिस्थिती निर्माण केली जात आहे, असा आरोप त्याने केला. तसेच, या कारवाईदरम्यान आपल्या आई-वडिलांनाही शारीरिक त्रास देण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे.
CJP च्या नेत्यांकडूनही सरकारवर टीका
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेत्यांची रविवारी सुटका झाल्यानंतर त्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका केली. पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, 'पंतप्रधान म्हणून मोदी हे भारतासाठी लाजिरवाणे आहेत. या देशाने यापूर्वी इतका भित्रा आणि दादागिरी करणारा नेता पाहिला नाही,' असे म्हटले.
'ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल'
CJP चे सहसंयोजक आशुतोष रांका यांनीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. 'ज्ञानेश कुमार हे देशद्रोही आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. अशा देशद्रोह्यांना पदावरून हटवण्यासाठी मला संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागले, तरी मी तयार आहे,' असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील (SIR) कथित अनियमिततांविरोधात CJP ने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन पुकारले आहे.