संविधान हातात घेऊन डी. के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; डॉ. जी. परमेश्वर नवे उपमुख्यमंत्री, १३ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश

Karnataka : दक्षिण भारतातील काँग्रेसचे प्रमुख चेहरा मानले जाणारे डी. के. शिवकुमार यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेली दोन वर्षे चर्चेत राहिलेल्या सत्तासंघर्षाचा अखेर यानिमित्ताने शेवट झाला.
संविधान हातात घेऊन डी. के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; डॉ. जी. परमेश्वर नवे उपमुख्यमंत्री, १३ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश
संविधान हातात घेऊन डी. के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; डॉ. जी. परमेश्वर नवे उपमुख्यमंत्री, १३ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश (Photo-X /@DKShivakumar)
Published on

बंगळुरू : गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या काँग्रेसमधील सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला असून डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी (दि.३) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस नेतृत्वाने अखेर शिवकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात १३ मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री

राज्याचे माजी गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात यू. टी. खादर, एम. बी. पाटील, के. जे. जॉर्ज, के. एच. मुनियप्पा, सतीश जारकीहोळी, रामलिंगा रेड्डी, कृष्णा बायरेगौडा, प्रियांक खर्गे, ईश्वर खांद्रे, बायरथी सुरेश, शरणप्रकाश पाटील आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांचाही समावेश आहे.

संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ

शपथविधी सोहळ्यात डी. के. शिवकुमार यांच्या हातात संविधानाची प्रत दिसून आली. लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस नेत्यांकडून संविधानाची प्रत हातात घेण्याची परंपरा सुरू झाली असून शिवकुमार यांनीही त्याच पद्धतीने संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

राहुल गांधी आणि खर्गे यांची उपस्थिती

या सोहळ्यास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. शपथविधीपूर्वी शिवकुमार यांनी राहुल गांधी आणि खर्गे यांचे विमानतळावर स्वागत केले.

जी. परमेश्वर यांची निवड महत्त्वाची का?

राजकीय समीकरणांचा विचार करता जी. परमेश्वर यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड महत्त्वाची मानली जात आहे. सिद्धरामय्या यांच्या 'अहिंदा' (AHINDA) मतदारांमध्ये मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याकांचा मोठा प्रभाव आहे.

दलित समाजातील प्रभावी नेता म्हणून ओळख असलेल्या परमेश्वर यांच्या निवडीमुळे काँग्रेसने सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

दोन वर्षांच्या सत्तासंघर्षाचा शेवट

२०२३ मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री या पदाची आळीपाळीने वाटणी करण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा होती. त्यानंतर शिवकुमार समर्थकांनी सातत्याने त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने शिवकुमार यांना मुख्यमंत्री या पदाची संधी दिली.

राहुल गांधींसोबत महत्त्वाची चर्चा

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी राहुल गांधी यांच्यासोबत जवळपास ३५ मिनिटे चर्चा केली होती. त्यावेळी त्यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, सिद्धरामय्या यांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय राहण्याची इच्छा व्यक्त केली.

शपथविधीनंतर सोशल मीडिया पोस्ट

शपथविधीनंतर डी. के. शिवकुमार यांनी भगवद्‌गीतेतील एक संदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला. "फळाचा विचार न करता तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्माच्या फळाची अपेक्षा तुझ्या कृतीमागचा हेतू असू नये आणि निष्क्रियतेतही तुझी आसक्ती नसावी," असे त्यांनी म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in