

आजच्या काळात पैशासाठी काहीही करण्याची प्रवृत्ती वाढलेली असताना भंगारात मिळालेले तब्बल १५ लाखांचे दागिने परत करून एका भंगारवाल्याने प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला आहे. हरियाणातील फरीदाबादमध्ये दिवाळीच्या साफसफाईदरम्यान चुकून भंगारात दिले गेलेले सुमारे १५ लाखांचे सोन्याचे दागिने एका भंगारवाल्याने मालकाला परत केले. भंगार व्यवसाय करणाऱ्या हाजी अख्तर खान यांचा हा प्रामाणिकपणा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
नेमकं काय घडलं?
माहितीनुसार, दागिन्यांचे मालक अशोक शर्मा हे गेल्या वर्षी कुंभमेळ्यासाठी जाणार होते. घरी कोणीच राहणार नव्हते, त्यामुळे चोरीची भीती सतावत होती. म्हणून त्यांनी तिकडे जाण्यापूर्वी सुमारे १०० ग्रॅम (जवळपास १० तोळे) सोन्याचे दागिने एका डब्यात सुरक्षित ठेवले आणि तो डबा घरातील भंगारच्या पोत्यात (रद्दी आणि जुन्या वस्तू ठेवलेल्या पोत्यात) लपवून ठेवला. पण, कालांतराने त्यांना याचा विसर पडला.
दिवाळीत घराची साफसफाई करताना दागिने असलेले पोते त्यांनी रद्दी, भंगार समजून भंगारवाल्याला विकले. पण, दिवाळीतच पूजेसाठी जेव्हा दागिन्यांची गरज भासली तेव्हा त्यांच्या चूक लक्षात आली आणि सोनं भंगारात गेल्याचं समजताच त्यांना मोठा धक्का बसला. लागलीच शर्मा यांनी भंगारवाल्याच्या गोदामात धाव घेतली. खान आणि शर्मा दोघांनी मिळून गोदामात साठवलेल्या भंगाराच्या ढिगाऱ्यात अथक शोधाशोध केली, पण काही उपयोग झाला नाही. अखेर निराश होऊन शर्मा घरी परतले, दागिने सापडण्याची आशा त्यांनी सोडून दिली होती. पण, आता जवळपास सहा महिन्यांनी (१७ फेब्रुवारी) खान गोदामातील भंगार सामानाचं वर्गीकरण करत होते, त्याचवेळी त्यांना सोन्याचा डब्बा दिसला. त्यांनी लगेच याची माहिती शर्मा कुटुंबाला दिली.
मी आयुष्यभर विसरणार नाही
एसीपी जितेश मल्होत्रा यांच्या उपस्थितीत पोलीस स्थानकात शर्मा कुटुंबाला दागिने परत देण्यात आले. "हाजी अख्तर खान यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा उदाहरणांमुळे मानवतेवरील विश्वास अधिक दृढ होतो." असे एसीपी मल्होत्रा म्हणाले. तर, "मी आधीपासून शर्मा यांना ओळखतो. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. माझ्या या निर्णयाला माझ्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. प्रामाणिकपणापेक्षा मोठं काही नाही" असे खान म्हणाले. दागिने परत मिळाल्यामुळे शर्मा कुटुंबीयांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. "खान यांनी आमच्यासाठी जे केले, ते मी आयुष्यभर विसरणार नाही", असे दागिने मिळाल्यानंतर भावूक झालेले अशोक शर्मा म्हणाले.
दरम्यान, या घटनेने आजही समाजात मानवता आणि प्रामाणिकपणा जपणारे लोक आहेत हे सिद्ध झालं. भंगार व्यापाऱ्याने एका कुटुंबाचा हरवलेला आनंद परत दिलाच शिवाय संपूर्ण समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.