Gold Adulteration Alert : सोनं स्वस्त झालंय म्हणून लगेच खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टी तपासा; GJC चा इशारा

सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, ग्राहकांची फसवणूक किंवा अन्य कोणताही गैरव्यवहार आढळल्यास त्याची माहिती जीजेसी किंवा थेट बीआयएसला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Gold Adulteration Alert : सोनं स्वस्त झालंय म्हणून लगेच खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टी तपासा; GJC चा इशारा
Gold Adulteration Alert : सोनं स्वस्त झालंय म्हणून लगेच खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टी तपासा; GJC चा इशारा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

सोनं स्वस्त झाल्याने दागिने खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा! कमी दरात सोनं मिळत असलं तरी खरेदी करताना सावध राहणं गरजेचं आहे. कारण, सोन्याची शुद्धता न वाढवता केवळ वजन वाढवण्यासाठी रेनियम आणि इरिडियमसारख्या धातूंचा वापर केला जात असल्याचे आरोप समोर आले आहेत. या वृत्तांची गंभीर दखल घेत 'ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल' (GJC) ने भारतीय मानक ब्युरोशी (BIS) संपर्क साधला आहे. बीआयएसनेही या प्रकरणावर लक्ष ठेवले असून सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जीजेसीने केले आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी शुद्धता, हॉलमार्क आणि बिलासह नेमक्या कोणत्या गोष्टी तपासाव्यात, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोन्याचे वजन वाढवण्यासाठी मिश्रधातूंचा वापर?

GJC च्या माहितीनुसार, सोन्याची शुद्धता त्याच प्रमाणात न वाढवता दागिन्यांचे वजन वाढवण्यासाठी रेनियम आणि इरिडियम आधारित काही मिश्रधातू वापरले जात असल्याचे आरोप आहेत. या वृत्तांची दखल घेत बीआयएसनेही प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. संबंधित परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Gold Adulteration Alert : सोनं स्वस्त झालंय म्हणून लगेच खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टी तपासा; GJC चा इशारा
Skincare Tips : जाहिरात पाहून स्किनकेअर प्रोडक्ट्स खरेदी करता? आधी 'या' गोष्टी तपासा; तज्ज्ञ सांगतात...

सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, ग्राहकांची फसवणूक किंवा अन्य कोणताही गैरव्यवहार आढळल्यास त्याची माहिती जीजेसी किंवा थेट बीआयएसला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे अशा प्रकरणांची चौकशी करून योग्य ती कारवाई करणे शक्य होईल.

कमी घडणावळीच्या शुल्काच्या आमिषाला बळी पडू नका!

जीजेसीचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नसली, तरी सतर्क राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सराफ व्यावसायिकांनी उत्पादक, घाऊक विक्रेते आणि पुरवठादारांकडून खरेदी केलेल्या सोन्याची गुणवत्ता काटेकोरपणे तपासावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्राहकांनी कमी घडणावळीच्या शुल्काचे आमिष दाखवणाऱ्या ऑफर्सपासून सावध राहावे. तसेच केवळ विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित सराफांकडूनच सोन्याचे दागिने खरेदी करावेत, असा सल्ला रोकडे यांनी दिला आहे.

Gold Adulteration Alert : सोनं स्वस्त झालंय म्हणून लगेच खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टी तपासा; GJC चा इशारा
सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

दागिने खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

सोन्याचे दागिने खरेदी करताना ग्राहकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी, असे जीजेसीने सांगितले आहे.

  • हॉलमार्क तपासा : बीआयएस केअर ॲपच्या माध्यमातून दागिन्यावरील हॉलमार्कची अधिकृतता तपासून घ्या.

  • पक्के बिल घ्या : दागिने खरेदी करताना वस्तू व सेवा कर (GST) नमूद असलेले अधिकृत बिल घेण्याचा आग्रह धरा.

  • विश्वासार्ह सराफ निवडा : केवळ प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच दागिने खरेदी करा.

  • गुणवत्तेची खात्री करा : दागिन्यांची शुद्धता आणि हॉलमार्किंगची माहिती तपासल्याशिवाय खरेदी करू नका.

दोषींवर कठोर कारवाईची जीजेसीची मागणी

जीजेसीचे उपाध्यक्ष अविनाश गुप्ता यांनीही या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. भारतीय दागिने उद्योगाने अनेक पिढ्यांपासून विश्वास, पारदर्शकता आणि गुणवत्तेच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे भेसळीच्या काही घटना किंवा अफवांमुळे संपूर्ण दागिने उद्योगावरील ग्राहकांचा विश्वास कमी होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व सराफ व्यावसायिकांनी आपली गुणवत्ता तपासणी प्रक्रिया अधिक मजबूत करावी आणि बीआयएसच्या हॉलमार्किंग नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे. तसेच फसवणुकीच्या उद्देशाने अशा मिश्रधातूंचे उत्पादन, पुरवठा किंवा वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका जीजेसीने मांडली आहे.

Gold Adulteration Alert : सोनं स्वस्त झालंय म्हणून लगेच खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टी तपासा; GJC चा इशारा
सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली

दरम्यान, सोन्याच्या शुद्धतेबाबत ग्राहकांचा विश्वास कायम राहावा यासाठी जीजेसी बीआयएस आणि संबंधित यंत्रणांसोबत काम करत राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)