गुजरातच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; तरुण नेते हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी, रिवाबा जडेजानेही घेतली शपथ

भाजपशासित गुजरातमध्ये गुरुवारी (दि. १६) राजकीय हालचालींना वेग आला आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्व १६ मंत्र्यांनी राजीनामे सादर केले. केवळ मुख्यमंत्री पटेल यांनाच पदावर ठेवत, संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला.
गुजरातच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; तरुण नेते हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी, रिवाबा जडेजानेही घेतली शपथ
Published on

भाजपशासित गुजरातमध्ये गुरुवारी (दि. १६) राजकीय हालचालींना वेग आला आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्व १६ मंत्र्यांनी राजीनामे सादर केले. केवळ मुख्यमंत्री पटेल यांनाच पदावर ठेवत, संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला. यानंतर शुक्रवारी (दि. १७) गांधीनगर येथील महात्मा मंदिरात नव्या मंत्रिमंडळाचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. राज्यातील तरुण नेत्यांपैकी एक असलेले हर्ष संघवी यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत एकूण २५ मंत्र्यांनी शपथ घेतली. या नव्या मंत्रिमंडळात १८ नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नवे चेहरे दिसले. टीम इंडियाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजानेही मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी स्वतः रवींद्र जडेजा उपस्थित होता.

नव्या चेहऱ्यांचा समावेश

माजी मंत्री मनीषा वकील आणि दर्शना वाघेला या महिलांना मंत्रीपद मिळाले आहे. तर, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले अर्जुन मोधवाडिया यांनाही मंत्रिपद देण्यात आले. तसेच, मोरबीचे आमदार कांतिभाई अमृतिया आणि माजी आयपीएस अधिकारी पीसी बरंडा यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. माजी भाजप अध्यक्ष जितू वाघानी यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले आहे.

गुजरातच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; तरुण नेते हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी, रिवाबा जडेजानेही घेतली शपथ
गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

समाजघटकांची रणनीती

नवीन मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह ७ पाटीदार, ८ ओबीसी, ३ अनुसूचित जाती (SC) आणि ४ अनुसूचित जमाती (ST) या घटकांचे प्रतिनिधित्व आहे. समाजघटकांतील संतुलन राखत पक्षाने येत्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सामाजिक गणित नीट जुळवल्याचे पाहायला मिळाले.

कोण राहिले मागे?

मागील मंत्रिमंडळातील काही प्रमुख नेत्यांना मात्र या वेळी स्थान मिळाले नाही. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जयेश राडाडिया यांसारखी नावे चर्चेत असली तरी त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र त्यांना पुन्हा अध्यक्षपदावरच कायम ठेवण्यात आले आहे.

एकूण २७ मंत्रीपदांची मर्यादा असलेल्या गुजरात मंत्रिमंडळात यावेळी २५ जणांनी शपथ घेतल्याने अजून दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे आगामी काळात आणखी काही नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. बिहार आणि इतर राज्यांतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील संघटन मजबूत करण्याचे उद्दिष्ट या बदलामागे असल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in