

हरयाणातील सिक्री येथील 'मिलन बँक्वेट हॉल'चा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून संतापाची लाट उसळली आहे. येथील प्रसाधनगृहांच्या दरवाजावर दिशादर्शक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्याशी मिळत्याजुळत्या प्रतिमा वापरण्यात आल्याचं समोर आलंय. पुरुष व महिला शौचालयाच्या दरवाजांवर लावलेल्या या प्रतिमांचा व्हिडिओ एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून नेटकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
देवघरात ज्यांचं स्थान... मुधोजीराजे भोसले संतप्त
नागपूरकर भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. "देवघरात ज्यांचं स्थान असे अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची विडंबना करणारा हरयाणा, सिक्री येथील 'मिलन बँक्वेट हॉल' मधील संतापजनक प्रकार! छत्रपती शिवाजी महाराज व राणी पद्मावतींच्या प्रतिमांचा वॉशरूम (HE/SHE) साइनेजसाठी वापर केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही कृती ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा अपमान असून सर्व धर्मीय समाजाच्या भावना दुखावणारी आहे. या हॉल/रिसोर्ट चे मालक माजी मंत्री, आमदार मुलचंद शर्मा व संबंधितावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. हरयाणा सरकारनेही प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हरयाणा विधीमंडळच्या पटलावर कार्यवाही करावी" अशी मागणी केली आहे.
सोशल मीडियावर संताप
व्हिडिओमध्ये ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या फ्रेमबद्ध प्रतिमा दरवाजांवर लावलेल्या दिसत आहेत. देशभरात आदराने पूजन केले जाणाऱ्या या महान व्यक्तींच्या प्रतिमांचा असा वापर केल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराला अनेकांनी असंवेदनशील आणि अपमानास्पद म्हटले आहे. "महापुरुषांचे फोटो कुठे लावायचे याची शिस्त नाही का?" असा सवाल एका युजरने केला आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, तर राणी पद्मिनी यांनी सन्मानासाठी बलिदान दिले, अशा ऐतिहासिक संदर्भांचा उल्लेख करत त्यांच्या प्रतिमा शौचालयाच्या दरवाजांवर वापरणे हे लाखो लोकांच्या भावनांवर घाव असल्याचे म्हटले आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप करत बँक्वेट हॉल व्यवस्थापनाविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तर काहींनी दंडात्मक कारवाईसह तात्काळ प्रतिमा हटवण्याचे आवाहन केले आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच हटवल्या प्रतिमा
दरम्यान, या प्रकरणावर अद्याप बँक्वेट हॉल व्यवस्थापन किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रतिमा जाणूनबुजून फलक म्हणून लावण्यात आल्या होत्या की सजावटीचा भाग म्हणून नंतर त्यांचा चुकीचा वापर झाला, याबाबत स्पष्टता देण्यात आली नाही. तथापि, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय स्तरांतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटताच दोन्ही प्रतिमा हटवण्यात आल्याचं समजतंय.