

हैदराबादमध्ये विमानतळावर ड्युटीसाठी निघालेल्या एका खासगी एअरलाईनच्या महिला केबिन क्रू मेंबरवर कॅब चालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी (दि.२०) घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला.
नैसर्गिक विधीचा बहाणा करून निर्जन ठिकाणी नेली कॅब
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित महिला कॅबने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्युटीसाठी जात होती. प्रवासादरम्यान चालकाने नैसर्गिक विधीसाठी जात असल्याचा बहाणा करत मुख्य रस्ता सोडला आणि विमानतळाजवळ बांधकाम सुरू असलेल्या एका शाळेजवळील निर्जन ठिकाणी कॅब नेली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तेथे गाडी थांबवल्यानंतर चालक काही वेळ बाहेर गेला. काही क्षणांनी तो पुन्हा आला आणि कॅबचा मागील दरवाजा उघडून महिलेवर जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
कॅबसह आरोपी फरार
घटनेनंतर आरोपीने महिलेला त्याच ठिकाणी सोडून कॅबसह पळ काढला. त्यानंतर पीडित महिलेने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तिला समुपदेशनासाठी 'भरोसा सेंटर' येथे दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.
आरोपीला अटक
महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी मंगळवारी शमशाबादमधील सिद्धांती परिसरातून २३ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस करत आहेत.