

अनेकांना पाळीव प्राण्यांविषयी प्रचंड आपुलकी असते. काहीजण त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपतात. मात्र, अशाच एका पाळीव मांजरीवरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादातून हैदराबादमध्ये २३ वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.
पाळीव मांजरीवरून सुरू झालेला वाद
मृत तरुणीची ओळख टी. प्रिन्सी उर्फ श्रेष्टा अशी झाली आहे. ती अलवाल परिसरात आई आणि आजीसोबत राहत होती. काही आठवड्यांपूर्वी तिने घरात एक मांजर आणले होते. मात्र, मांजरीमुळे तिला सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी आरोग्याच्या कारणास्तव मांजर घरात ठेवण्यास विरोध केला. यावरून घरात वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी तिची आई आणि आजी घराबाहेर गेल्या असताना ती घरी एकटी होती. त्या परत आल्यानंतर तिला छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून धक्का बसला. शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
तपास सुरू
या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून संशयित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हा कारणीभूत असावा असा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, प्रिन्सीने नुकतीच वैद्यकीय पदवी पूर्ण केली होती. ती पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची तयारी करत होती तसेच वैद्यकीय परवाना मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रियेत होती.
पाळीव प्राण्यांवरून सुरू झालेला छोटासा वाद इतक्या टोकाला जाऊन संपल्याने ही घटना हादरवून टाकणारी ठरली आहे. तरुण वयात घडलेल्या या घटनेमुळे मानसिक तणाव आणि भावनिक आधाराच्या अभावाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.