

नवी दिल्ली : WhatsApp युजर्सना मोबाईल नंबरऐवजी 'युझरनेम'द्वारे संवाद साधण्याची सुविधा देण्याच्या तयारीत असताना, या नव्या फीचरकडे केंद्र सरकारनेही लक्ष केंद्रित केले आहे. या प्रणालीमुळे सायबर फसवणुकीचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होत असून, सुरक्षेच्या दृष्टीने सरकार या फीचरचा आढावा घेणार आहे. तपासणीत काही त्रुटी आढळल्यास WhatsApp ची मूळ कंपनी Meta ला नोटीस बजावली जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.
फीचरवर केंद्र सरकारची बारकाईने नजर
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, देशातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार WhatsApp च्या नव्या युझरनेम प्रणालीची तपासणी करणार आहे. मोबाईल क्रमांकाऐवजी युझरनेम वापरण्याची सुविधा फसवणूक करणाऱ्यांसाठी नवे मार्ग खुले करणार का, की युजर्सची गोपनीयता अधिक मजबूत करणार, याचा अभ्यास केला जाणार आहे.
Meta ला नोटीस मिळण्याची शक्यता
माहितीनुसार, या परीक्षणादरम्यान सुरक्षेसंदर्भात किंवा प्रणालीतील काही त्रुटी आढळल्यास Meta कडून स्पष्टीकरण मागवले जाऊ शकते. आवश्यक असल्यास सुधारणा करण्याच्या सूचनांसह कंपनीला नोटीसही पाठवली जाऊ शकते.
मोबाईल नंबरशिवाय करता येणार संवाद
WhatsApp च्या या नव्या सुविधेमुळे युजर्सना स्वतःचा मोबाईल नंबर उघड न करता केवळ एका विशिष्ट युझरनेमच्या माध्यमातून इतरांशी संपर्क साधता येणार आहे. विशेषतः ग्रुप चॅट किंवा अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
युझरनेम तयार करणे ऐच्छिक
WhatsApp नुसार, युझरनेम तयार करणे पूर्णपणे ऐच्छिक असेल. युजर्स ॲपमधील प्रोफाइल किंवा खाते सेटिंग्जमधून युझरनेम तयार, बदल किंवा हटवू शकतील. युझरनेमची कमाल मर्यादा ३५ अक्षरांची असेल. तसेच प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रिटी आणि काही महत्त्वाच्या नावांचे संरक्षण केले जाणार आहे.
क्रिएटर्स आणि व्यवसायांसाठी विशेष सुविधा
कंटेंट क्रिएटर्स, व्यावसायिक आणि संस्थांना Instagram किंवा Facebook वर वापरत असलेलेच युझरनेम WhatsApp वर वापरण्याची सुविधा दिली जाणार आहे. यासाठी Meta च्या Accounts Centre द्वारे संबंधित खाती जोडावी लागतील.
गैरवापर रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा
बनावट ओळख तयार करून फसवणूक होऊ नये, यासाठी WhatsApp ने अनेक स्तरांवरील सुरक्षा यंत्रणा कार्यरत असल्याचा दावा केला आहे. संशयास्पद खात्यांना ब्लॉक आणि रिपोर्ट करण्याची सुविधा कायम राहणार असून, युजर्सना इच्छेनुसार 'युझरनेम की'च्या स्वरूपात अतिरिक्त ओळख पडताळणीचाही पर्याय दिला जाणार आहे.
टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी
WhatsApp हे फीचर जगभरातील वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार आहे. सुरुवातीला ही सुविधा मोबाईल ॲपवर उपलब्ध असेल. WhatsApp Web आणि Desktop आवृत्तीत ती नंतर जोडली जाणार आहे. कंपनीने वापरकर्त्यांना ॲपची अद्ययावत आवृत्ती वापरण्याचा आणि फीचर उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे.